This Ghazal is written in akshargan vrutt.
Vrutt is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA.
This Ghazal describes state of mind in various situations.
माझे मला न कळले का वागले असे मी
गझलेतल्या नशेला का भाजले असे मी
जोडून प्रेम धागे सारे जुने पुराणे
त्या चाळणीत काटे का चाळले असे मी
आकाश चांदण्यांनी भरले जरी नव्याने
पकडून काजव्यांना का डांबले असे मी
माझ्यात कोण दडले शोधून काढताना
हृदयातल्या फुलाला का झाकले असे मी
घालून मंद वारा फुलवीत या व्यथांना
पदरात कैक तारे का बांधले असे मी
पाऊस नाचतो हा वाहे भरून घागर
पण पावसास माझ्या का टाळले असे मी
साकी भरून देता प्याला तुला ‘सुनेत्रा’
मदिरेत भावनांना का घोळले असे मी
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.