This Ghazal is written in thirty (30) maatraas. Here, the radif is maitree and kaafiyaas are kar, sar, etc.
In this Ghazal the qualities of a true friendship are described.
मैत्री माझी बंधन नाही पण जुळलेले कर मैत्री
प्राजक्ताच्या देठावरल्या दवबिंदुचा सर मैत्री
मधुरा-भक्ती अबोल प्रीती वत्सल नाती जपावया
मृदेत भिजल्या बकुळ फुलांच्या प्रेमाचे अत्तर मैत्री
एकांताच्या बाकावरचे पारावरल्या गप्पांचे
चिवचिवणाऱ्या आठवणींचे गजबजलेले घर मैत्री
पहिली मैत्री पहिली प्रीती पहिले जे जे शुद्ध खरे
पहिले भांडण किती निरागस पुन्हा भांडण्या कर मैत्री
गहिरी प्रीती वेडी माया हवीहवीशी ओढ जुनी
नजरेचाही नेम चुकावा अशा फुलांचा शर मैत्री
सखी असो वा सखा असूदे प्रेम तयांवर करावया
हृदयामधला अहं काढुनी तयात थोडी भर मैत्री
विसरुन जा तू हेवे दावे नकोस उकरू शल्य जुने
प्रेम कराया शीक सुनेत्रा देते तुज मी वर मैत्री