This Ghazal is written in aksharganvrutta. Vrutta is GAA GAA LA, GAA LA GAA GAA, GAA GAA LA, GAA LA GAA GAA.
In this Ghazal the poetess says, Only ‘Veetaraag-mudraa’is pratik of pure soul.
ही वीतराग मुद्रा शुद्धात्म रूप आहे
पण पाप वस्त्रधारी म्हणते कुरूप आहे
मम कर्म जाळण्याला देहात धूप आहे
अन तेवण्यास ज्योती साजूक तूप आहे
कणसे मळून कुणबी राशीत धान्य ओते
देण्या तयास वारा हातात सूप आहे
बकध्यान कोण करुनी क्षमवी क्षुधा जिवाची
ध्यानात खोल जाता आनंद खूप आहे
सौंदर्य भावनांचे डोळ्यात रे पहावे
मंडूक रूप अपुले बघण्यास कूप आहे
वाटून किळस ज्यावर ते थुंकतील ते ते
त्यांच्याच वासनांचे विद्रूप रूप आहे
शोधू नकोस मजला तू अंबरात आता
राखेतला निखारा माझे स्वरूप आहे
वृत्त – गा गा ल, गा ल गा गा, गा गा ल, गा ल गा गा.