नाजुक सुंदर फूल मोगरा
जिनचरणीची धूळ मोगरा
कृष्णाचे गोकूळ मोगरा
तीन विटांची चूल मोगरा
मुक्तीचा सोपान निवृत्ति
ज्ञानीयांचे कूळ मोगरा
पुष्पांना नवरंग द्यावया
कुंकुम वर्णी चूळ मोगरा
उदक सुगंधी अभिषेकाचे
त्यात नाहते मूल मोगरा
धूरच नाही ऐसे वाहन
त्या गाडीचा रूळ मोगरा
नक्षत्रांच्या हस्तीसाठी
झुळझुळणारी झूल मोगरा
किरणांमधुनी धबाबणाऱ्या
वाग्देवीचे मूळ मोगरा
गोधूलीसम गौर औषधी
इक्षुरसाचा गूळ मोगरा
अक्षर गण मात्रांची वृत्ते
तोलत आहे तूळ मोगरा
पद्मावतिची लेक ‘सुनेत्रा’
आगकाडिचा गूल मोगरा
मात्रा वृत्त (८+८ = १६)