तुला भावलेली तुझी भावली मी
तिची कैक रूपे तुला दावली मी
कधी नोट कोरी कधी येन डॉलर
अधेली रुपाया कधी पावली मी
पहाटे सुगंधी मृदू साद येता
मधुर लाजलेली गुलबकावली मी
कुमारी सडा शिंपिता सांजवेळी
तिच्या अंगणी रंग-पुष्पावली मी
गळाभेट होता नव्या जाणिवेची
दिवाण्या मनाची निळी सावली मी
वृत्त – ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.