बोचरी थंडी हिवाळी शीळ घाली पाखरू
वारियाने वस्त्र उडता स्वप्न माझे पांघरू
काचता दावे गळ्याला उखडुनी खुंटी तिची
माळरानी धाव घेते धुंद अवखळ वासरू
दाटते आभाळ जेंव्हा मौन घेते ही धरा
वीज येता भेट घ्याया खडक लागे पाझरू
पाहण्या उत्सुक असे मी मुग्धतेतिल गोडवा
पावसाळी वादळाने तू नकोना बावरू
फेक ती काठी ‘सुनेत्रा’ गावयाला मोकळे
अडखळे पाऊल तेंव्हा एकमेका सावरू
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.