वादळे रोंरावताना मेघ गगनी ठाकती
शेर ओढी रथ ढगांचा ‘मी’ तयांचा सारथी
खेचुनी मम भाव सारे शून्य मी भासे कधी
छळत राही पण अनामिक सांजवेळी ओढ ती
पौर्णिमेचा चंद्र उगवे अंतरी माझ्या कधी
द्यावया आतूर हाका घन समुद्री गाज ती
वादळे बनतात जेंव्हा भावनांची गलबते
मीच प्रज्ञा मीच प्रतिभा मी सुमेधा अन रथी
बीज असुदे वा चतुर्थी ओढ लावी चंद्रमा
चांदण्यांसम बरसते मग रातराणी मुग्ध ती
तुटत राही तुटत राही जोडले कैसे जरी
बघ अचानक तव स्मृतींनी जुळुन येते तार ती
शारदेच्या प्रांगणी मी बागडे शब्दांसवे
तोलते कुरवाळते मज मायभू मम भारती
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.