सांग मी मम पुस्तकाचे पान का काळे करू
काजळीने लोचनातिल भाव का काळे करू
शान माझ्या चेहऱ्याची रुंद मोठे उंच जे
फक्त मजला शोभते ते नाक का काळे करू
धन्य झाले तृप्त झाले संत वचने ऐकुनी
झळकती ऐन्यापरी ते कान का काळे करू
मी न कुठले कार्य करते मी स्वतःला तोलते
तोलताना बोलताना ओठ का काळे करू
उजळ आहे भाल माझे गोडवा मम अंतरी
जहर भरले काव्य लिहुनी हात का काळे करू
या क्षमाशिल भूवरी मी जपुन टाकी पाउले
वासनेचा चिखल तुडवुन पाय का काळे करू
मी न छळले व्यर्थ कोणा माझिया स्वप्नातही
बोल मग मी इथुन आता तोंड का काळे करू
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.