उंचावुन तव रेखिव भृकुटी शरसंधाने मरतो मी
मिटल्या नेत्रा चुंबिताच तू जिवंत होउन उठतो मी
सजणे धजणे पिंड न माझा असा न भावे स्वतःस मी
ऐन्यावरची धूळ झटकता मम रूपावर भुलतो मी
सतेज कांती ताठ नासिका ऐनक नीतळ नजरेचा
हनूवटीवर खळी पाडुनी किती लाघवी हसतो मी
कर्तव्याचे मला न ओझे तो तर माझा धर्म खरा
वीर धनुर्धर जरी अहिंसक सत्यासाठी लढतो मी
माझे माझे कधी न म्हणतो तुलाच म्हणतो मी माझी
माझ्यासाठी प्राण प्रिये तू म्हणून तुजला जपतो मी
मात्रावृत्त (८+८+८+६=३० मात्रा)