ज्यात काफियासुद्धा नाही अशी आगळी गझल लिहू
भजले नाही ज्यात कुणाला असे वेगळे भजन लिहू
नियमावलीही अशीच बनवु अपवादाला नियम लिहू
शब्द आणखी अक्षर विरहित टिंबटिंबचे कवन लिहू
अंबर आभाळी आकाशी नाव नभाचे गगन लिहू
कुंपण घालुन बोरीभवती पाटीवरती सदन लिहू
जुळवायाला अचूक मात्रा डोळे झाकुन नयन लिहू
अलामतीला ठेवु सलामत वायुऐवजी पवन लिहू
धूसर क्षितिजाच्या रेषेवर रती आणखी मदन लिहू
हृदयातिल देवाच्या चरणी वंदन अथवा नमन लिहू
मात्रावृत्त – ८+८+८+६=३०मात्रा