श्वास त्यांचा मोकळा झाला परंतू… आज मी नाहीच तेथे
जाणत्यांची वाहते भाषा परंतू … आज मी नाहीच तेथे
फोडण्या नेत्रांस माझ्या लेखणीने… आंधळे सारे निघाले
पोचले ते माझिया गावा परंतू … आज मी नाहीच तेथे
वादळी मेघांपरी ते वर्षताना… मंदिरी वाजेल घंटा
अंतरीचा नाद तो माझा परंतू… आज मी नाहीच तेथे
गोठल्या आकाशगंगा गारठ्याने… गोठला तो धूमकेतू
होडक्याची कापते काया परंतू… आज मी नाहीच तेथे
शायरीचे वेड होते त्या ठिकाणी… कैफ तो गेला निघोनी
मैफिलीची जाहली शाळा परंतू … आज मी नाहीच तेथे
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा … गा ल गा गा, गा ल गा गा.