शस्त्र असूदे वार कराया प्रहार करण्या गदा असूदे
स्वभाव अपुला सदैव जपण्या निर्मल ‘मी’पण सदा असूदे
आत्मा ईश्वर वा परमेश्वर शुद्ध स्वभावी खुदा असूदे
ढळू नये मम सम्यकश्रद्धा दुःख व्यथा आपदा असूदे
ओळख नसते जरी कुणाची तरी वाटते ओळख आहे
ओळख जपणे नात्यांमधली हीच खरी संपदा असूदे
पुरे जाहले वृत्त घटविणे मोजित मात्रा शब्द पेरणे
भाव भिडाया मम हृदयाला सहज वाहती अदा असूदे
नाजुक धागा जो प्रेमाचा असे पुरेसा घरटे विणण्या
आत्म्यामध्ये जरी कुणाच्या वेगवेगळा खुदा असुदे
प्रतिमा बिंबे लोभसवाणी खीळ घालती गती मतीला
शिखर गाठणे आनंदाचे ध्यास चिरंतन सदा असूदे
काव्य कांडुनी भाव पिसोनी रुष्ट जाहली प्रीत खरोखर
मित्र कुणी जर असेल सच्चा माझ्यावरती फिदा असूदे
चक्रीवादळ गोल फिरविते गारा पिटती ऊन जाळते
आभाळाचे छप्पर असुदे कुशीत घेण्या मृदा असूदे
साखर पेरुन मातीमध्ये ऊस कधीना डुले शिवारी
काव्य फुलाया शब्द पेर तू बिदा जुदा अलविदा असूदे
अर्थ जरीना पूर्ण कळाला भाव कळावा अदा कळावी
प्रीत जरी तव मौनामधली तयात अस्फुट निदा असूदे
मी नच पाया नाही कळसा गर्भगृहातिल ज्योतीसम मी
फुलण्यासाठी कळ्यांप्रमाणे मुग्ध असोशी रुदा असूदे
अशी असावी दाद खरोखर उचंबळे जी हृदयामधुनी
त्यात नसावा स्वार्थ आपुला गझलेचा फायदा असूदे
अशीच वाहो गोदा गंगा सागरात त्या विलीन होण्या
जोहड धरणे जरी नद्यांवर जीवाचा फायदा असूदे
ओबडधोबड खडकांपासुन गोल गोजिरे गोटे घडती
या नीरेची किमया सुंदर झील कऱ्हा नर्मदा असूदे
अता न हटणे माघारी रे गाते कृष्णा खळाळणारी
होइल तेंव्हा संथ होउदे प्रपात तिजवर फिदा असूदे
जसा परंतू तसाच पण ही… शब्द वेगळे अर्थ तोच तो
शब्द नसावे गुंता करण्या तयांत निर्मल सदा असूदे
घेच शस्त्र तू तुझिया हाती वार कराया धर्मांधांवर
वार कराया मला न जमते माझ्या हाती गदा असूदे
किती कायदे नियम कागदी शासन दरबारी ती कलकल
खल कलहांचा नको कुटाणा प्रेमाचा कायदा असूदे
पुरे जाहला हा शब्द्च्छल सायोनारा म्हणते अंतर
मैफिलीतुनी जुदा व्हावया शब्द साजरा बिदा असूदे
उत्तम चारित्र्याने शांती अन ज्ञानाने सौख्यच मिळते
लिहित रहावे देण्यासाठी कलम तुझे ज्ञानदा असूदे
उत्तम चारित्र्याचा पाया घालुन देण्या गुरू असावा
प्रहार करण्या मिथ्यात्वावर सम्यक्त्वाची गदा असूदे
निर्मल मंदिर काया अपुली आत्मदेव हा त्यातिल मूर्ती
सम्यक्दर्शन त्याचे घ्यावे ज्ञान हीच संपदा असूदे
देह तगाया हवे अन्न जल प्राणासाठी हवा हवी
मिटून जाण्या क्षुधा नि तृष्णा हात तुझे अन्नदा असूदे
बाबा दादा भाऊ भैय्या मित्र मैत्रिणी भाई भाई
वृद्ध फुलांना आपण जपुया नाजुक हा वायदा असूदे
रविकिरणांची असुदे किलबिल जरी अरण्ये गच्च दाटली
निर्भय होउन मनुज फिरावा त्यात अभय श्वापदा असूदे
मी देहाचा कान करावा ऐकाया संगीत सृष्टिचे
आत आतल्या मम सादाची साद सदा सर्वदा असूदे
मयुरवाहिनी हंसवाहिनी म्हणतिल कोणी व्याघ्रवाहिनी
कशास वाहन… ही तर विद्या सरस्वती शारदा असूदे
2 responses to “निर्मल ‘मी’पण सदा असूदे – NIRMAL ‘MEE’PAN SADAA ASOODE”
Surekh……
thanks…