ही शमा ना जाळते तुज तू स्वतः जळतोस रे
रंगलेल्या मैफिलीतुन का असा गळतोस रे…
जाळते शम्मा तनूला जाळण्या कर्मे जुनी
गोठता ते मेण पुद्गल का तया मळतोस रे
अंतरी तेवेल समई उजळण्या गर्भास या
नाद ऐकुन झांगटांचा का इथे वळतोस रे
उलगडाया गूढ कोडे यत्न मी केले जरी
राहशी हृदयात माझ्या ना मला कळतोस रे
झरझरेना पीठ भरभर दोष जात्याचा नव्हे
धान्य ते ओले असोनी त्यास तू दळतोस रे
शुष्क माझ्या भावनांना वाहते केलेस तू
वाहते वेगात आता तू कसा ढळतोस रे
भाजते खरपूस पोळ्या मी जिवांना जगविण्या
फ़ुलुन येण्या जीव माझा तू पुऱ्या तळतोस रे
चैत्र येता मोहरावे ज्येष्ठ येता तू फळावे
आम्र अस्सल का म्हणू तुज फाल्गुनी फळतोस रे
चिंब का व्हावे अता मी वळचणीला थांबते
या अवेळी बरसुनी तू का तिला छळतोस रे