मी जेंव्हा पाखरू होते तेंव्हा झाडावर राहायचे
आणि सतत बडबडायचे कारण
तेंव्हा मला लिहिता येत नव्हते…
पण जेंव्हा मी पक्षी बनले तेंव्हा मी झाडावरून खाली उतरले
मग मी या झाडावरून त्या झाडावर
इकडे तिकडे चोहीकडे उडायला लागले…
मग मला वाचता पण यायला लागले
मग मी गप्पीष्ट झाले
मी निवांत गप्पा मारू लागले
पाखरांशी पक्ष्यांशी खगांशी आणि विहंगाशी सुद्धा!
जेंव्हा एका पक्ष्याशी माझं लगिन झालं;
तेंव्हा मी पक्षीण झाले…
मग मी परत लिहायला लागले
‘माझ्या’ विषयी, ‘तुझ्या’ विषयी आणि ‘त्यांच्या’ विषयी सुद्धा!
मग सगळ्या पक्ष्यांनी अन पक्षिणी यांनी तळ्याच्या काठी सभा घेतली
आणि ठराव केला कि ;
पक्षीणीने फक्त तिच्या पक्ष्याविषयीच लिहायचे
फार फार तर पाखरांविषयी किंवा अगदीच वाटलं तर खगांविषयी लिहायचं…
पण मी तर लिहीतच सुटले…
मग बर्याच पक्ष्यांनी आणि पक्षिणी यांनी आत्महत्या करायचे ठरविले
मग मी घाबरले पण घाबरत घाबरत का होईना पण सावरले…
मग मी थोडे दिवस फक्त पाखरांविषयी आणि विहंगाच्याविषयी लिहिले
मग थोडाकाळ परत सर्व सुरळीत झाले….
मग मी परत लिहायला लागले
फक्त माझ्या आवडत्या पक्ष्यांविषयी आणि पक्षोबांच्या विषयीच लिहायला लागले…
मग काही निवडक पक्षोब्बा आणि पक्षोब्बी यांनी तळ्याकाठी सभा घेतली
आणि स्वतः पण लिहायला सुरुवात केली…
पण मग एक मज्जा झाली
लिहिता लिहिता ते सगळे पक्षोब्बा आणि पक्षोब्बी
पक्षपाती बनले आणि
ठार वेडे झाले… आणि त्यांनी तळ्यात जल समाधी घेतली…
मग पक्षी मित्रांनी त्यांचे तळ्याकाठी पुतळे उभारले
तो दिवस अजूनही पक्षी कुलाचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो…