मूळ झालो काय किंवा डहाळी झालो काय
काम तर करावंच लागणार
ज्याला त्याला ज्याचं त्याचं !
मूळ झालात तर घ्या मातीत गाडून
पाणी शोधायला पसरा
हात पाय बोटे
तहान कोण्या कैक जन्मांची असतेचना
प्रत्येकाला !
म्हणूनच मुळाला करावं लागतं
पाणी प्यायचे काम…
त्याची तहान भागलीकी मग जमीन उघडते द्वार
अंकुर येतो त्यातून वर
खोड होण्यासाठी!
बाहेरची मोकळी हवा
सूर्य किरणांची ऊब
अवतीभवतीची किलबिल
चिवचिव च्रिप च्रिप
खूष व्हायला कारणे
खूपच खूप !
मग दिसामाशी वाढायचं
फांद्यांनी पानांनी भरून जायचं!
कधीतरी मग पानांच्या बेचक्यात
उमलते कळी
तिचं होतं फूल
हवं तर फळ सुद्धा!