कश्शाला पाऊस पडेल सांगा
कशाला पाऊस पडेल बाई
हृदय भरून येतच न्हाई
वाऱ्याची झुळूक चुंबत नाही
सच्छिद्र देह झरत नाही
डोळ्यात आसवे भरत नाही
पापण दले हलत नाही
पाऊस थेंब पडत नाही
लिहीग सई काहीबाही
लिहित रहा टपोर गाणी
दवाच्या बिंदूंचे साठव पाणी
मिसळ त्यात गारांचे पाणी
बुडव तयात मातीचे हात
सारव तयांनी अंगण गात
मातीला खणून कर तू आळे
लाव भूचंपेचे रोप तू बाळे
सानश्या झारीने घाल तू पाणी
भूचम्पकाची ऐक तू वाणी
येतील कळ्या साजीऱ्या पानी
येतील फुले छान नि खास
दोन तीन चार नि पाच
जांभूळ वर्णी फुलांचा नाच
नेत्रांत घे तू रंग भरून
हृदय तारेची छेड तू बीन
नाच तू तालात धन धन धीन
वीजही नाचेल तुझीयासंगे
आभाळी निळ्या मेघ तरंगे
हसत पाहू वाऱ्याचे दंगे
समाधी नभाची सत्वर भंगे
हालेल नभ झुलेल नभ
पाऊस गाणी गाईल खग
मेघांची फौज लढेल मोठी
गझल माझी भिजेल ओठी
उघड वीजे तू जलद तोटी
वर्षूदे धारा धो धो धो धोधो
रंगुदे मातीत पक्ष्यांचा खो खो
ये ग ये सरी होऊन परी
माझिया दारी आषाढ वारी
श्रावण सरी कळसावरी
घालून गळा मोत्यांच्या सरी
प्रेमाने मातीला भिजव खरी