बावन गज मी टाकित गेले जमीन मोजाया
सत्तावन फुट खोल उतरले विहीर खोदाया
अक्षर अक्षर नीट पारखुन शब्द उभे केले
शब्दांना मग वळव वळवले गझला बांधाया
शुद्ध जलाने भिजवित गेले निळीभोर वसने
चिंब भावना पुन्हा ठेवल्या उन्हात वाळाया
चावुन चोथा करून विषया टोळ पुरे थकले
निंदक आता बघा लागले मलाच टाळाया
बरे जाहले सुटका झाली या लोकांमधुनी
शीतल वारे वाहे झुळझुळ चवऱ्या ढाळाया
वाऱ्यामध्ये पुऱ्या वाळल्या शुद्ध शुद्ध झाल्या
कवितेमधल्या पऱ्या लागल्या झूले बांधाया
सुंदर गाणी आणि फ्यांटसी लिहीते परिझाद
अवती भवती जमल्या बघ वनदेवी वाचाया
मात्रावृत्त – ८+८+१०= २६ मात्रा