हृदयी माझ्या फूल उमलते नित्य गुलाबाचे
म्हणून जपते दवा बाटली पथ्य गुलाबाचे
मिटून डोळे मौनामध्ये गझल चुंबिताना
पापण काठी झुले गुलाबी सत्य गुलाबाचे
व्यथा प्रीतिची प्राशुन मदिरा नशेत असताना
अश्रू होउन झरते गाली शल्य गुलाबाचे
आधी मैत्री नंतर प्रीती हेच खरे जाणा
म्हणून असते काट्यांशीही सख्य गुलाबाचे
गुलाबपुष्पे रंगबिरंगी दूर प्रिय चालली
तुझे चोरुनी हृदय चोरण्या अन्य गुलाबाचे
शिशिरपाकळ्या पानगळीसम टपटप गळताना
अजूनही मज कौतुक वाटे वन्य गुलाबाचे
मात्रावृत्त – ८+८+१०=२६ मात्रा