आली मंगल घटिका खरी – AALEE MANGAL GHATIKAA KHAREE


दवबिंदूंनी घट भरला अन
थरथरली बासरी…आली मंगल घटिका खरी …

वेदीवरती प्रभू तीर्थंकर
कुंजवनी पक्ष्यांचे सुस्वर
भारद्वाज नि कोकिळ गाती
झुळूक फिरे नाचरी… आली मंगल घटिका खरी…

लता माधवी मुग्ध वल्लरी
उभ्या घेउनी पुष्प-आरती
निसर्ग ओते या पृथ्वीवर
सौख्याच्या घागरी… आली मंगल घटिका खरी …

पुनव चांदणे ऋद्धी सिद्धी
भिजे चांदणी कुलीन बुद्धी
वीज चमकते लखलख लखलख
झरण्या अक्षर सरी…आली मंगल घटिका खरी …

सखे सोबती वनचर आले
जलचर सुद्धा तृप्त जाहले
स्वर्गामधुनी देव-देवता
बघताती भूवरी … आली मंगल घटिका खरी …

अक्षतरूपी सुंदर वचने
रंगीत सुरभित कोमल सुमने
हासत नाचत रानामधुनी
उधळत ये वनपरी… आली मंगल घटिका खरी…

दवबिंदूंनी घट भरला अन
थरथरली बासरी..आली मंगल घटिका खरी …….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.