सूर्यकिरण कोवळे चुंबिता उमले कमळ कळी
कार्तिक स्नानासाठी उतरे बिंब रवीचे जळी
झळाळणाऱ्या पीत दुपारी मिटुन केतकी दले
जर्द पितांबर पांघरुनी बन सुवासिक झोपले
पिवळी तांबुस सांज मखमली श्यामल श्यामल धरा
टिपुर टिपुर टिपऱ्यांच्या संगे खळखळ गातो झरा
गोधूळीने दिशा रंगल्या गवळण काढे धार
गोप टाकतो गोठ्यामध्ये भारा हिरवागार
लाल निखाऱ्यावरी चुलीच्या पात्र ठेवता माय
शुभ्र दुधावर हलके हलके जमू लागली साय
बांबु बनातुन स्वैर भरारत वारा घाली शीळ
हिंदोळ्यावर चिमणपाखरा झुलवीतो घननीळ
टिपुर चांदणे पुनव कार्तिकी बागडते कौमुदी
हृदयजलावर सम्यक्त्वाची झरझरते कौमुदी