प्रश्नचिन्ह (कथा) आस्वादात्मक समीक्षा – PRASHNACHINHA


शालेय शिक्षणात पहिल्या इयत्तेत आम्हाला एक कविता होती.
“देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश देव देतो
सुंदर हा सूर्य☀️, चंद्रही🌙 सुंदर
सुंदर चांदणे पडे त्याचे ”

हे सुंदर आकाश देवाचे आहे. या आकाशातला चंद्र, सूर्य चांदणेही मग देवानेच निर्माण केले आहे. असा सुंदर समर्पित भाव व्यक्त करणारी ही कविता. ही कविता चार-पाच वर्षांच्या कोवळ्या मुलांच्या मनात जसे निसर्गाबद्दल आकर्षण, कुतुहूल निर्माण करते त्याचप्रमाणे विशाल सृष्टीतील सुंदर गोष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराबद्दल श्रद्धा जागवते. खरेतर या कवितेत आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. पण कोणी अतिरेकी बुद्धिवादी असेही म्हणू शकतोकी या अशा रचनेमुळे मुले आपल्या कर्तृत्व बुद्धीला नाकारतील. अंधश्रद्ध बनतील. खरेतर असे भीती बाळगण्याचे कारणच काय?

कोवळ्या वयातल्या मुलांना जर आपण पढवू लागलोकी हे जग अनादी अनंत आहे., ते कोणीही निर्माण केले नाही. आपला आत्मा वेगळा असतो आणि शरीर वेगळे असते. तप:साधना करून आपणही परमेश्वर बनू शकतो. तर काय होईल?

खरेतर हे तत्त्वज्ञानही आपल्या ठिकाणी योग्यच आहे. पण ते ग्रहण करण्याचेही एक वय असते. त्याचप्रमाणे आकाश, सौरमाला, ग्रह, तारे, प्रकाशकिरणांचा वेग, ढग कसे बनतात? पाणी हे एक संयुग आहे…हे समजण्याचेही एक वय असते. आणि हे समजावून देण्याघेण्याचेसुद्धा एक वय असते. काही मुले लहान वयातच जास्त चिकित्सक, गंभीरपणे विचार करणारीही असू शकतात. पण तो अपवादही असू शकतो.
सर्वसामान्यपणे या वयातली मुले कल्पनासृष्टीत रमणारी, असतात. मनाला कल्पनेचे पंख लावू रमणीय काव्यसृष्टीत विहरणारी असतात.

मुले हळूहळू मोठी व्हायला लागतात. एक एक इयत्ता वर वर जाऊ लागतात. आपापल्या स्वभावाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे कुटुंबियांचे , आजूबाजूच्या परिसराचे त्यातल्या माणसांचे निरीक्षण करायला लागतात. त्यानुसार त्या विशिष्ट परिसराचे, त्यात घडणाऱ्या घटनांचे, जीव सृष्टीचे ज्ञान त्यांना हळूहळू होत जाते. पुढे वाढत्या वयानुसार सृष्टीतल्या छोट्या मोठ्या गोष्टींमागची रहस्ये त्यांना कळू लागतात. त्यानुसार ज्या विषयात रुची असेल त्याप्रमाणे व्यक्ती त्यात जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यात करियर जरी करता आले नाही तरी वेगवेगळे छंद जोपासून त्यात आनंद मिळवण्याचा प्रयत्न करते.

किशोर आणि कुमार गटातून युवक किंवा युवती गटात जाताना मुलामुलींमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक स्थित्यंतरे होत असतात. कोणाला जीवशास्त्रात, तर कोणाला रसायनशास्त्रात, तर आणखी कोणास खगोलशास्त्रातही रस वाटू लागतो. कोणाला वकिली डावपेच आवडू लागतात, तर कोणास मानसशास्त्राचा अभयास करावा वाटतो. कोणी छान छान कविता लिहिण्यात रमायला लागतो.

कोणाकोणाला मी कोण? मी कोठून आलो? पुढे मी कुठे जाणार? या सृष्टीतल्या माझ्या अस्तित्वाचा नेमका अर्थ काय? असेही प्रश्न पडायला लागतात. मग त्यासाठी कोणी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो तर कोणी वेगवेगळ्या धर्मग्रंथात याची उत्तरे शोधू लागतो.

वय वर्षे १३ ते १९ हा काळ इंग्रजीत टीन एज म्ह्णून ओळखला जातो. बालकांचे मानसशास्त्र जसे वेगळे असते तसे टीन एजर्सचे मानसशास्त्रही वेगळे असते. बालकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कोणी आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न करतो. कधी त्या प्रश्नांचे खूप कौतुकही होते. पण टीन एजर्सचे प्रश्न याहून वेगळे असतात. या प्रश्नांची उत्तरे त्यांची त्यांनाच शोधायची असतात. फक्त त्यात आपण त्यांना मार्गदर्शन तेवढे करू शकतो… तेही त्यांची इच्छा असेल तरच !

‘प्रश्नचिन्ह’ या कथेचा नायक म्हणजे एक टीन एजर आहे. त्याच्या घरात विशेषतः त्याची आई त्याला समजून घेणारी आहे. त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे आहेत आणि आई नव्या जुन्याचा मध्य साधणारी आहे. एका संस्कारसंपन्न, त्यागी मुनींच्या घराण्याचा वारसा सांगणाऱ्या जैन धर्मीय कुटुंबातील हा युवक सुसंस्कारी, गंभीर व विचारीही आहे. पण त्याला देवाधर्माची अजिबात ओढ नाही. आपल्या जैनत्वाचा गाजावाजा करावा असे त्याला वाटत नाही.

लहानपणी एकदा आठदहा वर्षाच्याअजाण वयात बरोबरीच्या चुलत भावंडांच्या नादाने त्याने एक नेम घेतला होता. रात्री जेवायचं नाही.. संध्याकाळी सहानंतर खरकटं काही खायचं नाही. नियम मोडला तर मोठंच पाप ! फार वाईट घडणार… गुपचूप कोणालाही न सांगता घेतलेला हा नेम त्याने निष्ठेने कसोशीने पाळला आहे. पण कधीतरी संध्याकाळ उलटून गेल्यावर त्याने काहीतरी खाल्ले आहे… आणि मग तो कमालीचा बेचैन झाला आहे. डोळे मिटून धडधडत्या काळजाने तो देवघरात जाऊन बसला आहे. नकळत घडलेल्या या पापाची(?) टोचणी त्याच्या बालमनाला बरेच दिवस पुरली आहे.
आता या वयात ती भाबडी भक्तिभावना त्याच्या मनात उरलेली नाही, आहे ती फक्त दूरस्थ अलिप्तता.

तो एकत्र कुटुंबात राहणारा आहे. आजी-आजोबा, काका-काकी, चुलत भावंडे, भाबी अश्या बऱ्याच जणांचं ते कुटुंब आहे. त्यामुळे वेगवेगळया वयाचे, स्वभावाचे, कित्येक नमुने या मुलाने आपल्या घरातच पाहिले आहेत.
गावात पाचसहा जैन मंदिरे आहेत. त्याअर्थी गावातला जैन समाजही मोठा आहे. त्यामुळे महावीर जयंती, दिवाळीतला निर्वाण महोत्सव, पर्यूषण पर्व, चातुर्मासातील धार्मिक विधी-विधाने, पंचकल्याणिक पूजा, त्यांचा गाजावाजा, बोली-चढावे, झान्जपथक आणि ढोल ताशांच्या आवाजात निघणाऱ्या मिरवणुका, अहिंसा परमो धर्मकी जय च्या घोषणा, गर्दी गोंगाट आणि गदारोळात चालणाऱ्या पूजा,, अभिषेक, अष्टके, हे सारे त्याने बालपणापासून पाहिले आहे.

पण या असल्या पूजा विधानात त्याला काडीचा रस नाही. असल्या मिरवणुकीत त्याला सामील व्हावेसे वाटत नाही. या मिरवणुकीत अग्रभागी असणारी कितीतरी माणसे इतरत्र किंवा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात किती दांभिकपणे वाहतात, किती दिखाऊपणा करतात हे त्याला कोणी सांगण्याची गरज नाही.

मिरवणुकीतले हत्तीवरच्या अंबारीतून मिरवणारे सोनेरी मुगुटातले इंद्र-इंद्राणी, उन्हाने काळवंडलेले, घामेजलेले त्यांचे चेहरे पाहून त्याला कसेसेच का होते? मंदिरात निर्वाणाच्या दिवशी प्रत्येकाने मांडलेल्या वेगवेगळ्या पूजा, कंटाळवाण्या बेसूर आवाजात म्हटली जाणारी अष्टके, कोलाहल, गदारोळ, सातत्याने वाजणारं झान्गट, ते अनाकलनीय शब्द हे सर्व पाहून, ऐकून त्याचं मस्तक बधीर का होतं? त्याच्या पायांना सूक्ष्म थरथर का जाणवते? त्याला तेथून पळून जावंसं का वाटतं?

…. हे सारे प्रश्न आणि त्यापुढची प्रश्नचिन्हे त्या विशिष्ट वयातल्या संवेदनशील किंवा कोणत्याही वयाच्या संवेदनशील व्यक्तीला भेडसावतच असतात. मग तेथे धर्म कोणताहो असो ! तो कोलाहल, गदारोळ… रामनवमीच्या किंवा गोकुळ अष्टमीच्या उत्सवातील असो किंवा आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाच्या वेळेचा असो … कोणत्याही संवेदनशील माणसाला हे प्रश्न पडल्याशिवाय रहात नाहीत.

आपण पुस्तकात किंवा ग्रंथात वाचलेला रामजन्माचा उत्सव, पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीने प्रसन्न होऊन विटेवर उभा ठाकलेला विठ्ठल, तीर्थंकर बाळाला मेरू पर्वतावर नेऊन क्षीरोदधीने मंगल स्नान घालणारे इंद्र-इंद्राणी खुप वेगळे असतात. प्रत्यक्षातही ते अगदी तसेच किंवा आपण मनात रंगवलेल्या कल्पना चित्राप्रमाणे असावेत असे आपण कधीही म्हणणार नाही पण त्याचा निदान काळाप्रमाणे थोडातरी ताळमेळ घालता यायला हवा असे कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला वाटल्याशिवाय राहत नाही. पण इतर कोणतीही व्यक्ती आणि कथाकार किंवा कलावंत हा शास्त्री पंडित किंवा शास्त्रज्ञ यांच्यापेक्षा वेगळा असतो.

शास्त्रज्ञ मुळाशी जाऊन सत्य शोधण्यासाठी विज्ञानाच्या आधारे प्रयोग करतात. शास्त्री पंडित शास्त्रातील वचने समजावून देतात, मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचे समजावणे, मनावर बिंबवणे कलावंताच्या कलाकृतीपेक्षा खूप वेगळे असते.

कलावंताची कलाकृती ही खरेतर नीतिबोध द्यावा या उद्दिष्टाने निर्माण झालेलीच नसते. तिने फक्त रसिकांच्या बुद्धीत प्रवेश करून चालत नाही तर कल्पनेच्या द्वारे तिने हृदयस्थ भावनांना हात घालून आपल्याला विचारप्रवृत्त केलेले असते. कलाकृतीच्या आधारे जे मनावर बिंबले जाते त्याची जात खूप वेगळी असते.

समजा एखाद्या आर्थिकदृष्टया गरीब गवयाचे एक तुकडाभर शेत आहे. हे शेत दुष्काळी भागात आहे जेथे पाऊस बेभरवशाचा आहे. त्या गवयाला पोटापाण्यासाठी त्या शेतातल्या पिकावरच अवलंबून राहावे लागते. मग उत्तम असा मेघमल्हार गाऊन त्याला कोणी तुझ्या शेतात पाऊस घे म्हणले तर ती त्याच्या कलेची घोर विटंबना नाही काय… एखादा बडा जमीनदार प्रकल्प वर्षेच्या वैज्ञानिक प्रयोगाने पाऊस पडून घेऊ शकतो.. कारण त्यासाठी त्याच्याकडे पैसा असतो, पाईपलाईन करून एखादा शेतकरी नदीचे पाणी शेतात आणून शेत पिकवू शकतो. त्यासाठी त्याचे संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असावे लागतात.

पण गरीब गवई काय करणार… शेतात मैफल भरवून त्याच्यासारख्याच गरीब शेतकऱ्यांच्या पुढे तो जेव्हा एकतानतेने मेघमल्हार गाऊ लागतो तेव्हा त्याचा शेतीभातीला पाणी पुरवठा करण्याचा उद्देश नसतो. त्याचे गाणे ऐकताना रसिक श्रोत्यांच्या मनात ज्या अनाम भावभावनांचे मेघ दाटून येतात आणि त्यामुळे त्यांचे डोळे ही जेव्हा बरसायला लागतात तेव्हा गरीब गवयाला जो अपूर्व आनंद लाभतो तो वेगळ्या पातळीवरचा असतो. पण तो आनंद पोटाची भूक भागवू शकत नाही.
त्याचप्रमाणे एखादी कविता, कथासुद्धा गरीब गवयाच्या गीत गायनाप्रमाणेच ऐकताना किंवा वाचताना रसिकाच्या डोळ्यातून हृदयात प्रवेश करते. त्याच्या अंतरात काहीतरी उमटवते. तसे काहीतरी उमटवावे असा कवीचा किंवा लेखकाचा हेतू कदाचित ती लिहिताना नसतो. तो ती उस्फुर्तपणेही लिहीत असतो.पण ती कलाकृती रसिकाला आनंद देणारी असते. अर्थात त्या कलाकृतीद्वारे आनंद घ्यायचा की कुतर्क करून स्वतःच्या व दुसऱ्याच्या डोक्यालाही ताप द्यायचा हे त्या श्रोत्यांच्या किंवा वाचकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते.
प्रश्नचिन्ह या कथेतूनही वाचता वाचता असेच सुंदर भावतरंग अंतरात उमटत जातात. त्यातल्या नायकाला पडणाऱ्या प्रश्नाचे तरंग आपल्याही मनात खळबळ माजवतात.

प्रश्नचिन्ह या कथेतले गाव आपणही कधीतरी कुठेतरी पाहिलेलेच असते. गावातल्या मंदिरात यांत्रिकपणे होणाऱ्या पूजा आपणही पाहिलेल्या असतात. झाडाझुडपांच्या गर्दीत वसलेली राम, कृष्ण, विठ्ठल, दुर्गामाता, या मंदिरांच्या आसपासच कुठेतरी वसलेले जैन मंदिरही आपण पाहिलेले असते. आभाळात घुसलेली त्यांची शिखरे पाहून आपणही नतमस्तक झालेले असतो.
दिवाळीचा सणही कथेतल्याप्रमाणे आपण साजरा करत असतो. पण यातल्या कथानायकाला यात काहीही स्वारस्य वाटत नाही. दिवाळीच्या दिवसात रात्री जागजागून दिवाळीचे फराळाचे पदार्थ करणाऱ्या तरुण आणि प्रौढ स्त्रिया, ऐन थंडीत पहाटे शुचिर्भूत होऊन मंदिरात जाणाऱ्या सासुरवाशिणी, त्यांचे थकलेले डोळे, शिणवटा पाहून त्याच्या मनाला प्रश्न पडेकी… अशी श्रद्धा आपल्यात का नाही? त्या बायकांच्यात असणारी ही श्रद्धा आहेकी त्यांच्या नसानसात भिनलेले धार्मिक संस्कार? त्यांचे भाव आपल्याला का कळत नाहीत? असे अनेक प्रश्न नायकाच्या मनात दाटून आल्याने कथा पुढे पुढे सरकत जाते.

वर्षानुवर्षे दिवाळीत होणारे वहीपूजन, अष्टगंधाने रेखलेले ,-” ॐ.र्हीं.श्रीं.वीतरागाय नमः।”….. अष्टकामागून अष्टके, चौरंगावर साठणारा अक्षत लवंग बदाम खारकांचा फळाफुलांचा ढीग, पूजा संपल्यावरचा फटाक्यांचा दणदणाट… मग पहाटेच्या रेशमी अंधारात घाई-गडबडीत मंदिरात गेलेले सर्वजण .. या सर्वांमधून तो वेगळा आहे. एकटा आहे. यात त्याचं लक्ष कधीच लागत नाही पण नंतर फटाक्यांची आणि मिठायांची रिकामी खोकी, वहीपूजनाचा थाट आवरताना त्याचं मन का हुरहुरतं? ही हुरहूर ही उदासी कधीकाळी आपणही अनुभवलेली असते. कोणी या साऱ्यात उत्साहाने श्रद्धेनं भाग घेतं … तर कोणी त्यातले फारसे कळत नसूनही सारेचजण करतात म्हणून यांत्रिकपणे हे सर्व करीत असतात.
पण मग यातून हे सारं कशासाठी करायचं? यातून कोणाला कसला आनंद मिळतो… असे प्रश्न पडणारा कलावंत खरोखरच एक अज्ञानी पाखण्डी जीव असतो काय? इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची कलावंताला ही शिक्षाच असते काय? असे प्रश्न यातल्या “तो” प्रमाणे वाचकांनाही पडत असणारच.
पण खरेतर खरा कलावंत याला शिक्षा मानत नाही. विचारमंथनातून, चिंतनातून तो कलाकृती निर्माण करतो. दुसऱ्यालाही विचारप्रवृत्त करतो. कलावंताची निर्मितीक्षमता हे त्याला मिळालेलं वरदान असतं.

जैन समाजात मुनीसंस्थेला फार महत्वाचं आणि आदराचं स्थान आहे. आगमातील ज्ञान, आचार यांचं प्रत्यक्ष दर्शन घडवणारी मुनीसंस्था जैन धर्माचा एक प्रमुख आधारस्तम्भ आहे.
मुनींना आहार देणं, चौका लावणं यात श्रद्धाळू जैन श्रावक श्राविका हिरिरीने भाग घेत असतात. प्रश्नचिन्ह या कथेतही अशाच एका आहारासाठी निघालेल्या जैन मुनींचे दर्शन आपल्याला होते.

‘ चौक्याची तयारी होताच दारादारातून वृद्ध, तरुण, लेकुरवाळ्या श्राविका आचार्यांना पडगाहन करण्यासाठी तिष्ठत उभ्या होत्या. पहिलंच घर, विलक्षण सौम्य सात्विक चर्येची एक वृद्ध श्राविका – थकलेली वाकलेली, थरथरत्या -कापल्या आवाजात आचार्यांना पडगाहन करू लागली….. भो स्वामी ! नमोस्तु…. नमोस्तु… ! डोळ्यात दाटलेला भक्तिभाव, आतुरता, हातात वेगवेगळी फळं धरून ती पुन्हा पुन्हा पडगाहन करत होतो. आचार्य घुटमळत थांबत – किंचित पुढं जाऊन परत पुन्हा वळत – पुन्हा घुटमळत – शेवटी पुढे निघून गेले. वृद्ध श्राविकेची निराशा वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटली. त्याला उगाचच वाईट वाटलं. तिला तो जवळून ओळखत होता. त्या स्त्रीची श्रद्धा- तिचा ‘भाव’ खरोखरच सत् होता. मग आचार्य तिच्याकडे का पटले नसावेत? काय असेल त्यांची ‘धारणा’?….

त्याला पडणारे प्रश्न हे असे आहेत… आणि ते त्यालाच का पडतात हाही त्याला पडणारा त्याच्या हळव्या मनाला छळणारा खरा प्रश्न आहे.

मंदिरात कुठलेतरी धार्मिक विधान आहे. घरी पाहुणेमंडळी जमली आहेत. विधानाची भव्यता, मानापमानाची नाटकं यावर रसभरीत गरमागरम चर्चा सुरु आहे. सारेजण अशा गोष्टींवरच उत्तेजित होऊन बोलताहेत पण धार्मिक विधानातील धर्मावर कोणीच कसं बोलत नाही? त्याला हे सगळं आवडत नसूनही अशी चर्चा ऐकण्यात नकळत मनापासून रस का वाटतोय? का ही मानवी मनाची नैसर्गिक उपजत प्रवृत्तीच आहे?
पूजेचा भव्य मंडप, दागिन्यांनी लडबडलेल्या, घामाने थबथबलेल्या स्त्रिया, छोटे छोटे ग्रुप्स, सेंटचा भपकारा यामध्ये निरामयता, मांगल्य, निर्मलता त्याला शोधूनही सापडत नाही.

त्याग समताभाव शुचिता साधेपणा… या भक्कम पायावर आधारित जैन धर्म आणि समोर चाललेला प्रदर्शनी धार्मिक सोहळा – ते वैभव तो झगमगाट याचा नातेसंबंध कुठून कसा जुळवावं? याच लाखो रुपयातून दुसरं काही होऊ शकलं असतं. अनाथाश्रम, वृद्धाश्रम.. पण शेवटी ज्याची त्याची श्रद्धा… कुणाच्या श्रद्धेवर आघात करण्याचा कुणाला काय अधिकार? अश्या प्रश्नांनी त्याचा जीव घुसमटतोय. तो स्वतःवरच चिडतोय. त्याचा श्वास कोंडला जातोय…. आणि मग त्याला तेथून जीव घेऊन पळत सुटावसं वाटतंय.

खरोखरच त्याला हे प्रश्न पडतात. मग त्याला हे प्रश्न पडतात हा त्याचा गुन्हा आहे काय? त्याची घुसमट या कथेत इतक्या तीव्रतेने प्रामाणिकपणे व्यक्त झाली आहेकी त्यासाठी कसल्याही अलंकारिक भाषेची गरजच नाही. यातल्या ‘ तो ‘ ची भूमिका कोणाच्याही भावनांचे उद्दीपन करण्याची नाही किंवा त्या विधी-विधानांचे, विरोधाभासाचे तिखटमीठ लावून वर्णन करण्याचीही नाही. जे आहे ते असेच आहे आणि या सर्वातून त्याला काय प्रतीत झाले याचे दर्शन त्याने घडवले आहे.

कथेतली वर्णने फक्त उद्वेगातून किंवा मनाच्या विरंगुळ्यासाठी आलेली नाहीत. या सर्वातून त्याला जे उमगले, जे स्वीकारावे वाटले, जे टाकावे वाटले तेच या कथेच्या माध्यमातून साकार झाले आहे.
ललित कथेतून विरंगुळा किंवा घटकाभराची करमणूक होऊ शकते पण तेच तिचे ध्येय कधीही नसते. कलावंताचे मन त्या विशिष्ट अनुभवाशी तादात्म्य पावते व मग स्वतःला जे जाणवले त्याचे इतरांना दर्शन घडवते.

या कथेतला “तो” विद्यार्थी आहे. बी.ए. साठी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना तो जैन दर्शनावर तुटून पडला आहे. वस्तुमात्राचा सर्वांगीण, वस्तुनिष्ठ, बुद्धिनिष्ठ विचार करणारा अनेकांतवाद त्याच्या बुद्धीला आव्हान देणारा असला तरी तो त्याला पेलवणाराही नाही याची त्याला जाणीव आहे.
धर्म फक्त धर्मग्रंथापुरताच मर्यादित आहेका? तत्त्वज्ञानात सांगितलेली तत्त्वे व्यवहारात आचरणात अशी भ्रष्ट स्वरूपात का पाहायला मिळतात? का आपलीच नजर दूषित आहे? चांगलं काही आपल्याला दिसतच नाहीका? का आपण एकाच बाजूने विचार करतो? अभ्यास करतानाही असे अनेक प्रश्नांचे भुंगे त्याच्या डोक्याचा भुगा करीत असत.

या कथेतून व्यक्त झालेले जैन जीवन, पूजापाठ, रीतिरिवाज, मुनींच्या आहारविधीचे वर्णन, त्यावेळची होणारी श्राविकांची भावस्थिती, हे सारे कपोलकल्पित मुळीच नाही. ते सारे वास्तवाच्या पायावर उभे आहे. पण ते वर्णन सरधोपट नाही. ते लालित्यपूर्ण आहे. कलात्मक आहे. एका संवेदनशील युवकाच्या मनातील आंदोलने व्यक्त करणारे आहे आणि अशीच आंदोलने ते आपल्याही मनात निर्माण करणारे आहे. म्हणूनच ती कला आहे, ललित कला आहे.
लेखकाच्या भाषेवर, साहित्यावर , ज्या कुटुंबात, ज्या परिसरात तो जन्माला आला त्याचे संस्कार असतात. तसे ते असण्यात काहीच गैर नाही कारण कलावंत लेखक हासुद्धा जीवनानुभव घेणारा एक माणूसच असतो.
लेखक अनुभव स्वतःच घेत असतो. तो ते बाह्यजगातूनही घेत असतो. पण लिहिताना या अनुभवांचे एक वेगळे संघटन लेखनातून अविष्कारित करतो.

या कथेतले “तो” व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचे आणि ठळकपणे नजरेत भरणारे पात्र म्हणजे “ती” आहे . “ती ” त्याची चुलतबहीण आहे. हे पात्र जर या कथेत नसते तर कथानकाचा सांधा ढिला राहिला असता.
ती त्याची चुलत बहीणच नाही तर त्याची जिवाभावाची मैत्रीणही आहे. त्याच्याच वर्गात शिकणारी आहे. छोटी मोठी व्रते, उपवास करणारी, धार्मिक वृत्तीची आहे. ती त्याच्यासारखी अबोल, गंभीर नाही… उलट ती खूप अवखळ, बोलघेवडी आहे.

त्यानंतर कथेत भाद्रपदातल्या दशलाक्षणिक व्रताचा उल्लेख आला आहे. तो एकदा कॉलेजातून घरी आल्यावर त्याला कळले की त्याच्या या बहिणीने या व्रतातील दहा उपवास धरले आहेत. आपल्याला हि गोष्ट तिने का सांगितली नाही याचा त्याला रागही आला आहे आणि तिची काळजीही वाटत आहे. स्वतःचा राग, नापसंती बहिणीच्या कानावर घालण्याचे धाडस मात्र त्याला होत नाही.
तिचे उपवास सुरु झाले आहेत. छापलेल्या पत्रिका नात्यागोत्यातल्या माणसांना रवाना झाल्या आहेत. नातेवाईकांची वर्दळ, पूजेसाठी फुले, फळे,नारळ यांचा पडणारा खच, २०-२५ जणांचा रोजच शिजणारा स्वयंपाक.. अनंत वाटा पैशाला फुटल्या आहेत. तिच्या उपवासाचा सातवा दिवस उजाडलाय. रंगीबेरंगी शालू, अंबर यांच्या मखरात लोडाला टेकून ती शांतपणे बसली आहे. डोक्यावर भरजरी अंबराचा पदर घेऊन ती शांतपणे बसली आहे. सात दिवसात पोटात अन्नाचा कण नाहीकी पाण्याचा थेम्ब नाही.तरीही कसली उलघाल नाहीकी बेचैनी नाही. तिचं नेहमीचं खळाळणारं निर्झराचं रूप त्याला परिचित आहे पण तिचं प्रौढत्व… तिचं हे सात्विक रूप त्याला एखाद्या स्वर्गीय देवतेप्रमाणे वाटत आहे. तिच्या आंतरिक श्रद्धेचं केवढं हे भावाबळ ! अनामिक अश्या ऋजू भक्तिभावनेने त्याचं हृदय उचंबळून आलं आहे. तिच्या संयमाला, श्रद्धेला दुर्दम्य इच्छाशक्तीला त्याची अंतरीची उचंबळून आलेली प्रेमभावना, भक्तिभावना प्रणाम करते आहे.

इथे मात्र त्याच्या मनात नेहमीच उठणाऱ्या प्रश्नांना हळुवार झुळकेने स्पर्श केला आहे. प्रश्न कुठल्यातरी अनाम उत्तराने विरघळून गेले आहेत. कथेला हलकेच कलाटणी मिळाली आहे. त्या दर्शनाने त्याच्या अंतरीच्या श्रद्धेला आवाज दिला आहे. पण हे सारं तेवढ्यापुरतंच आहे. पण तेवढ्यापुरतं का होईना ते घडलं आहे.हीच तर मानवी जीवनातली चमत्कृती आहे.

उपवासाचे दहा दिवस निर्विघ्नपणे पार पडले आहेत. घरात आता उपवासाच्या पारण्याची तयारी सुरु आहे. पालखीसोबत चालत चालत साऱ्या मंदिरातून दर्शन घेऊन नंतर शहाळ्याचं मधुर पाणी पिऊन तिने उपवास सोडला आहे. सर्वांनाच आता खूप मोकळं मोकळं हायसं वाटत आहे. त्यालाही खूप मोकळं मोकळं वाटतंय. तो पुन्हा त्याच्या माणसात त्यांच्या भावभावनात रंगून गेलाय.

रसोड्यात जैन आचारी आणि घरातल्या बायकांची स्वयंपाकाची धांदल उडाली आहे. पंक्तिमागून पंक्ती उठत आहेत. थट्टामस्करी, हास्यविनोद, ताटात फेकलेले उष्टे पदार्थ, मंडपाबाहेरचा उसळलेला भिकाऱ्यांच्या कालवा, फटाके भिकारी, हडकुळी कळकट पोरं. मंडपाजवळ घुटमळणारी भटकी कुत्री, आशाळभूत नजरा पाहून त्याचं मन पुन्हा विस्कटलंय. कितीही कोडगेपणा करायचा म्हटले तरी त्याला ते जमत नाही. सकाळी भरपूर नाष्टा हादडून तो परत जेवायला बसलाय. पण आता त्याची जेवणावरची वासनाच उडाली आहे. मनात पुन्हा तोच जीवघेण्या प्रश्नांचा आणि न सापडणाऱ्या उत्तरांचा खेळ सुरु झाला आहे.

त्यानंतर परत एकदा घर शांत झालंय. दहा दिवसातली धावपळ संपून अखेर घर सुस्तावलंय. त्याच्या मनातले प्रश्नही कदाचित उसळून परत सुस्तावले आहेत. त्याची बहीण परत आता कॉलेजला येणार आहे. दुपारी जेव्हा तो कॉलेजातून घरी आला तेव्हा त्याने पाहिलं ऐकलं… तेच त्याच्या बहिणीचं चिरपरिचित दिलखुलास बोलणं, खळखळून हसणं, तीच आरोग्यसंपन्न सतेज कांती… त्याला पाहून ती लगबगीने बाहेर आली.ते पाहून त्याला थोडंसं आश्चर्य आणि थोडं बरंही वाटलं. पण पुन्हा तोच दबलेला संताप उसळी मारून वर आला.

मखरात पाहिलेली नंदादीपासारखी शांत, सौम्य, प्रगल्भ बहीण आणि आत्ताचं तिचं ते निर्झरासारखं खळाळणारं रूप, … यातलं काय खरं काय खोटं त्याला काहीच कळत नाहीय.. त्याचा उत्साह कोमेजला … आणि मग त्याला आठ्वली त्याच्या मस्तकात उठलेली सणक – पारण्याची मेजवानी आणि मंडपाबाहेर उसळलेली भूक… म्हणून तो तिला म्हणतो,
” छान झालेकी तुझे उपास ! पण एवढे दहा दिवस उपास केलेस त्यापेक्षा तेवढे दिवस उपाशी माणसांना जेऊ घातलं असतंस तर?”
त्याला ती अंतर्बाह्य ओळखून आहे. त्याचं उत्कट निष्पाप मन ती जाणते. पण याक्षणी हा प्रश्न अनपेक्षित नसला तरी चमत्कारिक वाटतो आहे… म्हणूनच काही न सुचून ती म्हणते,
” काहीतरीच काय बोलतोसरे? त्याचा आणि याचा काय संबंध? अरे व्रत असतं ते ! भावनेनं श्रद्धेनं मी करते. एवढी मोठमोठी पुस्तकं शेकड्यानं पडलीत आपल्या देवघरात. थोडी वाचून तरी बघ. मग कळेल तुला! ”
….. आणि मग चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन तो उभा आहे. त्या प्रश्नचिन्हाच्या मागेही कितीतरी प्रश्नचिन्हं दबा धरून उभी आहेत. अशी ही एकंदर कथा आहे.

या कथेत रंगवलेली दोन व्यक्तिमत्वे म्हणजे ” तो” आणि त्याची बहीण. दोघेही सुसंस्कारित आहेत. संवेदनशील आणि सुस्वभावीही आहेत. पण त्याला जे प्रश्न पडतात ते एकतर तिला पडत नसावेत किंवा जरी पडले तरी तिच्या परीने तिने त्याची उत्तरे शोधली आहेत.

कर्मकांडात रमलेला समाज, मूळ तत्वे आणि आचार यातली तफावत, विरोधाभास, त्याच्याप्रमाणे तिलाही जाणवत असणारच. पण तिची प्रवृत्ती त्याच्यापेक्षा वेगळी आहे. जगाचा राग ती स्वतःवर काढून चिडत धुसफुसत बसत नाही.
देवघरातली पुस्तके ती मनापासून वाचते. त्यातून हवे ते मिळवते. मनातल्या प्रश्नांवर सोल्युशन शोधते. आणि त्यातूनही आनंदच मिळवते.

या दोघांची व्यक्तिमत्वे काहीशी परस्परविरोधी भासली तरी परस्परपूरक अशीच आहेत. या व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षातून कर्कश्य नाद निर्माण होत नाही तर मधुर संगीतच निर्माण होतं. आणि या ध्वनीतून निर्माण होणाऱ्या स्पंदनातून लेखकाने मोठ्या कौशल्याने त्याला उमगलेला धर्म चित्रित केला आहे.
त्याने त्याच्या बहिणीत एक बडबडी, अवखळ, किशोरी पाहिलेली आहे , एक सुस्वभावी सद्गुणी, श्रद्धाळू मैत्रीणही पाहिली आहे. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवसात तिच्या चेहऱ्यावरच्या शांत भावदर्शनात एक अनोखं देवत्वही अनुभवलं आहे. तिचं ते प्रौढत्व त्याला जसं ओढ लावणारं आहे तसंच त्याला तिच्यापासून दूर नेणारही आहे.
तिचा समंजसपणा आणि त्याच्या वागण्यातली विपरीतता यामुळे तो स्वतःही संकोचतो आहे. पण हे असं वेगळं विपरीत जाणवुनही त्याला काहीतरी गवसलं आहे.

महाबळेश्वरसारख्या ठिकाणची निसर्गाची बोलकी शांतता, निर्मनुष्य मंदिरातल्या निरव शांततेची… ध्यानस्थ मूर्तीबद्दलची ओढ आणि बहिणीच्या उपवासाच्या काळात त्या दिवशी त्याच्या अंतरात उचंबळून आलेली ती अनाम भक्तिभावना हे सर्व म्हणजे काय आहे? त्या देवत्वाबद्दल वाटणारी ती सुप्त ओढच नाही काय?

या कथेतल्या त्याला पडणारे प्रश्न खरेतर आपल्यालाही पडतच असतात. त्यामुळे कधी आपण त्रस्त होतच असतो… तर कधी कथेतल्या तिच्याप्रमाणे यावर आपल्या परीने आपण उपाय करतच असतो. आपल्याला त्यातून अशीच खूप वाटचाल करायचीच असते.

अशीच वाटचाल कथेतला “तो ” करत आहे. या वाटचालीत त्याला जे काही गवसलय ते हातातून पुन्हा निसटून जाऊ नये म्हणून त्याची धडपड चाललेली आहे. या धडपडीतून पुन्हा काही नवीन प्रश्न निर्माण होताच असतात. ते संयमाने सोडवायला त्याला स्वतःच प्रयत्न करायला पाहिजे.

पण असं गवसलेलं जर हातातून निसटून जाऊ नये असं वाटत असेल तर त्याच्या बहिणीने त्याला एक उपाय सुचवला आहे. देवघरातली पुस्तके वाचण्याचा… हा उपाय खूप समयोचित आणि मार्मिकही वाटतो. … कारण पारण्याची मेजवानी आणि मंडपाबाहेर उसळलेली भूक पाहून त्याच्या मस्तकात उठलेली सणक ही भरल्यापोटीच उठलेली आहेना?

पण तिने मात्र त्या दहा दिवसाच्या उपवासाच्या काळात त्याच भुकेशी संग्राम केला आहे. परिस्थितीने झालेली उपासमार आणि श्रद्धेने केलेले उपवास यात कारणांचा फरक असला तरी पोटात उसळणारे भुकेचे डोंब मनाला अस्वस्थ करणारेच असतात. त्या अस्वस्थपणातही स्थूल आणि सूक्ष्म फरक असतीलही… पण ते अनुभवण्याचा हाच एक मार्ग तिच्यापाशी आहे.
आजकाल जैन धर्मातील उपवासांवर बरेचसे जैनेतर किंवा जैनसुद्धा टीका करताना आढळतात. त्यांच्या मते आत्म्याचा शोध घ्यायचा तर मग शरीराला क्लेश कशासाठी द्यायचे?
पण शरीराला कृश केल्याशिवाय, उपासमारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय, थंडी वारा ऊन पाऊस…यात साधना केल्याशिवाय गोरगरिबांची भूक,थंडीत कुडकुडणाऱ्या फुटपाथवरच्या जीवांना होणाऱ्या वेदना आपल्या आत्म्याला कश्या जाणवणार?
शेवटी यात कोणाची कोणावर जबरदस्ती नसतेच. तो मार्ग आपण स्वखुषीनेच अवलंबलेला असतो. तो कोणाला आचरण्यायोग्य वाटत नसेल तर त्यावर टीका करणे कितपत योग्य आहे?

कधीकधी शंभर शास्त्री पंडितांच्या प्रवचनातून जे साध्य होत नाही ते कलावंताच्या एखाद्या कलाकृतीतून अश्या प्रकारे साध्य होऊ शकतं. कारण कलावंत हा सामान्य संसारी माणसांच्या मनात शिरू शकतो … कारण तो त्यांच्यातलाच एक असतो.

म्हणूनच कलावंताच्या मनाला पडणारे प्रश्न, त्याची गवसलेली पुसटशी अंधुक उत्तरे, पुन्हा पडणारे नवीन प्रश्न, त्यातून भोवतालच्या माणसांचा, समाजाचा शोध घेण्याची त्याची धडपड अखंड चालूच राहणार असते. ती अतृप्ती, ती धडपड त्याच्या निर्मित्युसुक मनाला नवनव्या निर्मितीसाठी सतत प्रवृत्त करत असते. त्याला पडणारे प्रश्न जर त्याला पडलेच नाहीतर कलेची निर्मिती होणारच नाही.

कथेच्या शेवटी मंदिरापुढचा मानस्तंभ व त्यातल्या कोरीव घुमटाखाली विसावलेल्या भगवंताच्या ध्यानस्थ मूर्तीचा उल्लेख आला आहे. या ध्यानस्थ मूर्तीपुढे त्याच्याच घरातून जमा केलेल्या भातोड्यांवर कावळे निश्चिन्तपणे ताव मारत आहेत. पण या मूर्तीस त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही.
जैन मंदिरातील मूर्ती ही मुक्तात्मा परमेश्वराचं प्रतीक असते.

आपल्या हृदयस्थ आत्म्यालाही वासनांचे कावळे असेच छळत असतात. त्यामुळेच हृदयस्थ आत्मा कर्मबंधनात जखडला जातो. मग निर्माण होणाऱ्या कार्माण वर्गणांकडे आपला आत्माही कधी ध्यानमग्न होऊन पाहत असेल काय? माझ्या मनाला हा सहज सुचलेला एक विचार आहे.. लेखकाला यातून असं काही सुचवायचं आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही.

शेवटी एक मात्र सांगावे वाटते की कलावंताला आपल्या कलाकृतीतून कोणी काय घ्यावे, काय टाकावे, कोणते मत व्यक्त करावे याच्याशी काहीही देणेघेणे नसते. पण कुठे काही खटकलं मनाला क्लेश देणारं आढळलं, जाणवलं तर त्यावर निर्भीडपणे मत मांडणं कलावंताला भाग पडत… कारण कलेची उर्मी त्याला स्वस्थ बसूच देत नाही.

‘प्रश्नचिन्ह’ कथा, लेखक- प्रशांत शहा, कथासंग्रह- अभिषेक (समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग ५), पृष्ठ क्र. ४७ ते ६३
संपादन – श्रेणिक अन्नदाते, सुमेरू प्रकाशन
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सौ. सुनेत्रा नकाते


2 responses to “प्रश्नचिन्ह (कथा) आस्वादात्मक समीक्षा – PRASHNACHINHA”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.