मी न दुखविले व्यर्थ कुणाला म्हणून मजला दुःख नसे
सदैव जपली अंतरज्वाला म्हणून मजला दुःख नसे
हृदयी माझ्या रहावया ये कायमचे तू खरे खरे
असे निमंत्रण दिले सुखाला म्हणून मजला दुःख नसे
निसर्ग नियमांचे नित पालन करुन रक्षिते स्वधर्म मी
स्वच्छ ठेविते ह्रुदय जलाला म्हणून मजला दुःख नसे
अक्षर अक्षर सजीव होते लहरीवर मम काव्याच्या
थेंबे थेंबे भरे ढगाला म्हणून मजला दुःख नसे
मोद वाटुनी मोदच मिळतो कशाचीच ना मज चिंता
तिलांजली मी दिली भयाला म्हणून मजला दुःख नसे
मात्रावृत्त- १६+८+६=३० मात्रा