जाति : परिलिना
अजूनही तुझी छबी अंतरात आई.. (धृ.पद)
दूर कुठे जाहलीस तुला पाहते मी
सांजवात लावुन तुजसवे बोलते मी
सुगंध धूप दरवळे
शोक दूर दूर पळे
स्वप्न तुझे पूर्ण फळे
अंगणात पुष्पांनी वाकली ग जाई ..
दादांची सखी प्रिया होतीस तू माय
नातवंडे तुला जणु दुधावरील साय
वदन तुझे सुस्वरूप
हास्य तुझे चंद्ररूप
नेत्र शुद्ध नीर कूप
पार सहज केले तू खंदक अन खाई..
इतुके तू प्रेम दिले उणे ना कशाचे
हिमतीने परतवले वार घातक्यांचे
काव्यातुन झरताना
विश्व पुरे बघताना
मानाने जगताना
अणु रेणू परमाणुत तूच ठाई ठाई ..
अजूनही अंतरात अंतरात आई…