कनक कस्तुरी उधळुन गेली, आई माझी मुक्ती रमणी
कोमल सुमने फुलवुन गेली, आई माझी मुक्ती रमणी
स्वर्गामधले विमान पुष्पक, घेउन येता माझे दादा
दवबिंदुंना माळुन गेली, आई माझी मुक्ती रमणी
अनेक कन्या पुत्र तिचे प्रिय, दादा पण तिज, प्राणाहुन प्रिय
त्यांच्या वाटा शोधुन गेली, आई माझी मुक्ती रमणी
गझला कविता कथा समीक्षा, हृदयापासुन तिने जाणल्या
शास्त्र चिकित्सा शिकवुन गेली, आई माझी मुक्ती रमणी
नीर क्षीर कण न्याय करोनी, देह आपुला इथे ठेवुनी
हवेत सुरभित मिसळुन गेली, आई माझी मुक्ती रमणी
सौंदर्याची जिवंत प्रतिमा, तिचे हासणे शुभ्र चांदणे
वाण फुलांचे घडवुन गेली, आई माझी मुक्ती रमणी
मोति पोवळे पेरत गेली, कोमल हृदये जोडत गेली
दगडी हृदये हलवुन गेली, आई माझी मुक्ती रमणी
मात्रावृत्त(८+८+८+८=३२ मात्रा)