In this Ghazal the poetess describes ten best virtues in human beings. this ghazal is written in 16 matras.
क्षमा धर्म हा पाया उत्तम
या झाडाची छाया उत्तम
मार्दव माझे मम गझलेसम
चिंब चिंब भिजवाया उत्तम
आर्जव म्हणजे सरल-तरल मन
मस्त मोगरे जाया उत्तम
सत्य शिवाहुन सुंदर असते
पुरते कळले राया उत्तम
संयम म्हणजे जणू कस्तुरी
अत्तरातला फाया उत्तम
शौच म्हणा वा, शुचिता मजला
पावित्र्याची माया उत्तम
तप-जप करता हृदयापासुन
गळा लाभतो गाया उत्तम
त्याग करावा अहंपणाचा
तन-मन-धन मिळवाया उत्तम
अकिंचन्य आत्म्याचे भूषण
खरेखुरे मिरवाया उत्तम
ब्रम्हचर्य मृदु कवचकुंडले
कषायांस अडवाया उत्तम