पाय का हे पोळताती घातले जोडे तरी
का न तृष्णा ही मिटे रे नीर ही गोडे तरी
धावती हे लोक म्हणुनी धावशी वेड्यापरी
ऐकण्या गुज अंतरीचे थांबना थोडे तरी
बैसले घोड्यावरी मी सैर करण्या डोंगरी
का अडे मन पायथ्याशी दौडते घोडे तरी
मूढ मी होते खरी अन गूढ त्या होत्या जरी
प्रेमगोष्टी भावल्या मज वाटल्या कोडे तरी
कचकड्याच्या बांगड्यांना नजर का भुलते तुझी
गोठ अस्सल सोनियाचे घातले तोडे तरी
नाचणाऱ्या बाहुल्यांना पाहुनी तो चळतसे
त्रस्त ती होते अशाने लक्ष्य ना सोडे तरी
तूच देशी प्रेरणा अन तूच देशी कारणे
कार्य करण्या उठविशी पण घालशी खोडे तरी
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.