नको निळे अन, नको गुलाबी, पत्र धाड रे खरे नबाबी
लिहुन मायना, वहिनी भाभी, पत्र धाड रे खरे नबाबी
रंग रुपाची, सुमार चर्चा, हेवेदावे, तू तू मी मी
वगळुन असल्या, क्षुल्लक बाबी, पत्र धाड रे खरे नबाबी
रंगबिरंगी, फूल सुरंगी, सुकले अथवा, असो कागदी
सुगंध घोळुन, त्यात शबाबी, पत्र धाड रे खरे नबाबी
नको प्रिय लिहू, आदरणियही, स. न. वि.वि. ची ती, लघूलिपीही
कशास मुजरे, अर्ज अदाबी, पत्र धाड रे खरे नबाबी
बकुळफुलांचा, बंद लिफाफा, फक्त भिजवितो, पापणकाठां
भरून येण्या, नेत्र शराबी, पत्र धाड रे खरे नबाबी
कडकडणाऱ्या, तेलामध्ये, तडतडणाऱ्या, कटु प्रश्नांची
देत उत्तरे, हजरजबाबी, पत्र धाड रे खरे नबाबी
लाल केशरी, पिवळा काळा, वर्ण टाळुनी, गुलाबातले
जांभुळवर्णी, चिनी गुलाबी, पत्र धाड रे खरे नबाबी
मात्रावृत्त (८+८+८+८=३२ मात्रा)
One response to “खरे नबाबी – KHARE NABAABEE”
अहाहा …
वारंवार वाचतोय ..
फारच विलोभनीय …
मनोविलासाचा भावविश्वातील शिरकाव ..
व भावविश्वाने मनोविलासाच्या क्षितिजावर रंगछटा उधळणे ..
सुर ..नाद ..ताल ..लय .. लालित्य .. लावण्य … शब्द संगती .::
आल्हाद .. आवेग .. अनावर …
अहाहा ..::
ललीत लेणे लेवून आली .. मुगाजलाती गझल गजाला ;
ही आलापी ही बेताबी ..पत्र धाड रे खरे नबाबी!!
– विनोद
मुगाजलात .. प्रियेची चर्चा …