काही गोष्टी
कळत असतात
पण वळणावर
वळत नसतात
सैरावैरा पळत असतात….
गोष्टी अशाच
द्वाड असतात
वाऱ्यासारख्या उनाड असतात. .
मुसंडी मारून
मनात घुसतात
तुझ्या माझ्या… आठवणींना
उचकटतात
विस्कटतात
चहूकडे भिरकावतात ….
एक इकडे एक तिकडे
एक वर एक खाली
एक तिकडे कोपऱ्यात
कोणी हळवी कोमात ….
एक हसते एक रुसते
कोणी चिडते धुमसत बसते
कुणी वेडी गच्चीवरती
पडून हुंदके देत असते …
हलके हलके
वारा थांबतो
सावल्या ढळतात
मावळतीच्या किरणांसंगे
आणखी नवीन… गोष्टी येतात
चाफ्यावरती
किलबिलतात….
आठवणींच्या नाजुक काड्या
हळूहळू …गोळा करतात …
साजुक आपल्या
अश्रूत बुडवून
उतरत्या छपराचं
घर बांधतात …
दारं खिडक्या सारवलेलं अंगण
अंगणाभवती जाळीचं कुंपण
कुंपणावरच्या जाई जुई
म्हणतात मला
बोलना सई … बोलना सई ….