घाट – GHAAT


This poem is written in muktchhand. This poem describes various paths in our journey of life. Every person is free to choose his own path.

निळा जांभळा डोंगर, शुभ्र शुभ्र शिखर!
साद घालतय कधीपासून,
आकाश गर्भाच्या तळातून!

कितीकिती वाटा… आपल्याला वाटतात,
वरती वरती जाणाऱ्या.
झळाळणाऱ्या उडवणाऱ्या, चकवणाऱ्या,
गोल गोल फिरवणाऱ्या;
काही मऊ मखमली, काही काटेरी,
कुठली निवडावी वाट अन… पार करावा हा घाट?

ही स्वच्छ पाऊल वाट…
संन्यस्त श्रमणांची पावले रेखणारी!
कशी मानवेल आम्हाला?
संयमाविना घसरवणारी!

ही अवघड खडी वाट,
सरळ सोटखडा अन वळणावळणाचा घाट!
रात्रीच्या अंधारात पार केली,
त्या हिरा गवळणीने!
तानाजीही चढला ती,
घोरपडीच्या मदतीने!

ही कुठली वेगळी वाट?
ठोकलेले तंबू अन राहुट्यातला थाटमाट…

कोणी नाचताहेत बेधुंद होऊन,
कोणी पडताहेत तोल जाऊन,
कोणी झिंगताहेत कोणाला तरी पाजून!

ही दगडी पायवाट…
घडवलेल्या पायऱ्या, सतराशे साठ!
पायरी पायरीने वर जायचे…
क्वचित उडी मारून, थोडे अंतर कमी करायचे!
योग्यांचा संयम, अन गोपिकेचे वात्सल्य,
आणि … तानाजीचा पुरुषार्थ!
जर नसेल जमणार इतक्यात, तर…
नाहीच हवेत उडायचे,
पायऱ्यावरील झुंडीत
नाही हरवून जायचे…
आवाजाच्या गोंगाटातही,
आतल्या आवाजाला जपायचे!

त्यासाठीच निवडेन मीही,
निळीसावळी वाट…
सोबतीला झऱ्याचा
निरागस खळखळाट!

खळखळणारा झरा,
मला वर वर नेणारा…
काठावरची त्याच्या फुले! जणू हसणारी मुले!
गाणे त्याचे माळेन मी, कोकिळ कंठी गळ्यात!
निळाईलाच पांघरेन ऊन-पावसाच्या खेळात…

आणखी बऱ्याच वाटा, इकडच्या अन तिकडच्या…
मला मात्र हीच भावली,
जाळीत लपलेली धुक्याच्या!

माहीत नाही मला कधी पोचेन वर…
खंत नाही करणार पण,
खाली यावे लागले तर!

पुन्हा एकदा स्नान करेन,
या खळाळणाऱ्या पाण्याने,
जाईन पुन्हा गात गात, एका नव्या वाटेने!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.