व्यर्थ कुठे हळहळली नाही
अधेमधे ती वळली नाही
सुबोध भाषा या गझलेची
पण मूढांना कळली नाही
नागीणीसम असून चपला
भिववाया सळसळली नाही
जरी पेटली जरी भडकली
कुणावरीही जळली नाही
तेल तापता फुलून आली
अर्धी कच्ची तळली नाही
वादळ गारांच्या माऱ्याने
फांदीवरुनी गळली नाही
परिघामधुनी सहजच सुटली
इथे तिथे ओघळली नाही
मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)