सुकुमार पाकळ्यांचे जाणून भाव काही
रानातल्या फुलांचे घडवू जडाव काही
लढण्यास आम जनता आहे तयार जेथे
तेथे रणांगणी मी सोसेन घाव काही
कुजणार संपदा ही येताच मोड त्याला
मुलगी म्हणे पित्याला करते लिलाव काही
भालावरी चिरी ती रेखून आज आली
पाते तिला सुरीचे म्हणतात राव काही
ज्यांच्यात हे पडोंनी होतात जायबंदी
ते बुजाविण्यास खड्डे घालू भराव काही
आहे पराभवाची खात्री जरी तयांना
ठोकून बैसले ते तंबू पडाव काही
येते इथे ‘सुनेत्रा’ गंधोदकास नेण्या
वेशीतल्या भुतांची शमण्यास हाव काही
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.