असो चाळिशी वा पन्नाशी जगण्याची रे गंमत घे
साठी बुद्धी नाठी खाशी जगण्याची रे गंमत घे
विशीतल्या गुजगोष्टी स्मरुनी काव्य प्रीतिचे नवे रचू
घड्याळ बांधू बारा ताशी जगण्याची रे गंमत घे
सम्मेदाची यात्रा केली श्रवणबेळगोळा गेलो
कशास आता हाजी काशी जगण्याची रे गंमत घे
रानपाखरांसंगे गाऊ हस्ताच्या धारेत भिजू
रानी डुलते कंच कपाशी जगण्याची रे गंमत घे
कांदा भाकर लसूण ठेचा चवीचवीने खाऊया
नकोच राहू गड्या उपाशी जगण्याची रे गंमत घे
गझल मात्रावृत्त(१६/१४/) ३० मात्रा