जमणार नाही- JAMANAAR NAAHEE


काळजाशी बोलल्याखेरीज माझ्या… मौन हे माझे तुला कळणार नाही …
काळजाला हात मी घालू कशीरे … काळजाला दुखविणे जमणार नाही …

काळजाला चुम्बते मी पापण्यांनी… वार करणे भिजविणे रुचणार नाही
सरळ कर तू वार मी हटणार नाही… दाद दे! हा हट्ट मी करणार नाही…

दाद द्यावी लोचनांनी आसवांनी… हलविल्याविन काळजा हलणार नाही
सर अता येऊन गेली मौक्तिकांची! दूर तूरे  हे तुला दिसणार नाही…

आसवांनी हारणे हे हारणे  ना … हार याला मानुनी भुलणार नाही …
नजर माझी बेरकी ही शोध घेते … हे असे दडणे तुझे दडणार नाही …

घाव ना हा फूल वेडे चुंब  त्याला… गंध त्याविन अंतरी भरणार नाही…
काळजाची स्पंदने की कापणे हे … गूज त्या म्हणणे मला पटणार नाही …

अंबराला चुंबिल्याखेरीज आता… हा फुगा तुमचा जुना फुटणार नाही
माकडाच्या लांबलेल्या शेपटीला… ताणुनी मी व्यर्थ बघ पिळणार नाही …

हृदय आहे ज्यात ऐसा संगणक मी… गोष्ट खोटी भारुडे रचणार नाही
खास नावाला ‘सुनेत्रा’ जागणारी… आंधळयांशी येथल्या लढणार नाही…

वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा.. . गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.