‘धारणात धर्म: ‘म्हणजेच ;
ज्याच्या योगाने व्यक्तीची, व्यक्तींची किंवा त्यांच्या समूहाची धारणा होत असते त्याला धर्म असे म्हणतात.
” धृ ” या धातुपासून धर्म शब्द बनला आहे आणि “धृ” याचा अर्थ धारण करणे असा आहे.
धर्म हा अध्यात्मिक क्षेत्रातील शब्द असून उपासना, तत्त्वविचार व सदाचार यांना धर्म म्हणतात. जरी असे असले तरी आजकाल आचारातील अनेक गोष्टींचा कर्मकांडाचा समावेश धर्मात होत गेला आहे. त्यामुळे धर्माचा सत्यार्थ धर्मापासून अनवधानाने दूर होत गेला आहे.
त्याचप्रमाणे दैनंदिन व्यवहारात पती-पत्नी, पिता-पुत्र, गुरु-शिष्य बंधू-बहीण राजा-प्रजा इत्यादी संयुक्त शब्दांतील धर्माचा अर्थ परस्परांशी परस्परांचे कर्तव्य होय.
सत्य अस्तेय, अहिंसा या धर्मानुयायी लोकांना सर्वकाळी समानतेने पटणाऱ्या गोष्टींचा नीती धर्मात समावेश होतो.
“वत्थु सहावो धम्मो” ही जैनधर्माने केलेली धर्माची व्याख्या आहे.
वस्तूचा स्वभाव तो वस्तूधर्म आणि आत्म्याचा स्वभाव तो आत्मधर्म!
आत्मा चैतन्ययुक्त आहे ज्ञानमय आहे व इतर वस्तू पुद्गल आहेत जड आहेत असे मानले जाते. व्यवहारात चैतन्ययुक्त आत्मा हा जीव आणि शरीर, पुद्गल याना अजीव म्हटले जाते.
जैनधर्म या सामासिक शब्दातील जैन हा शब्द जिन या शब्दाने तयार झाला आहे.
जिन म्हणजे कोण..
जिन हे आपणासारख्याच एकेंद्रीय ते पंचेंद्रिय सैनी,असैनी जीवांमधुन उत्क्रांत होत जीवांमधूनच निर्माण होतात. जिन बनण्यासाठी पुरुषार्थाची जादू करावी लागते. अशी जादू किंवा चमत्कार घडण्यासाठी सम्यक श्रद्धेची ज्ञानाची चारित्र्याची आवश्यकता असते. आणि हे फक्त मनुष्य पर्यायातच शक्य असते.
जीवाचे बहिरात्मा, अंतरात्मा व परमात्मा हे तीन भेद असतात.
ज्या मनुष्यास सम्यकदर्शन-ज्ञान-चारित्र्य हे रत्नत्रय प्राप्त होते तो अंतरात्मा जिन बनू शकतो.
अश्या जिनदेवाकडून सांगितलं गेलेला जो सत्यश्रद्धानयुक्त विचार आणि आचार व त्याने केलेला जो उच्चार तो म्हणजे जैनधर्म होय.
जैन धर्म व इतर धर्म यांचे परस्पर संबंध-
पूर्वीपासूनच भारत भूमीवर वैदिक व बौद्ध धर्मीयांशी जैन धर्मियांचे धार्मिक झगडे, लढे होऊन उन्नत व अवनत अवस्था त्यांनी अनुभवल्या आहेत. त्याचप्रमाणे काळाच्या ओघात परस्परांवर एकमेकांच्या संस्कृतीची छाप व ठसे पण उमटले आहेत. वैदिक धर्म यज्ञप्रधान तर जैन धर्माचा याज्ञीक कर्मकांडास विरोध ! त्यासाठी वैदिकांनी वेदांचे महत्व व मान्यता कायम ठेवून उपनिषदांची रचना केली. पण उपनिषदे अध्यात्मिक म्हणवत असली तरी हिंसादी याज्ञीक कर्मकांडाचे समर्थन करत असत. त्यामुळे जनतेत त्या काळात हिंसेबद्दल घृणा निर्माण होऊन ती त्याचा निषेध करू लागली. याचा परिणाम म्हणू जैन धर्माबद्दल वैदिकांचा द्वेष वाढत गेला.
जैनधर्माचे वर्तमानकालीन चोविसावे अंतिम तीर्थंकर महावीर हे थोड्याफार काळाच्या फरकाने भगवान गौतम बुद्ध समकालीन असून त्यांच्या अनेक समानता आहेत. दोन्हीही वेदांस प्रमाण मानत नाहीत आणि याज्ञीक हिंसेचे विरोधक आहेत.
पण या दोन्ही धर्मात फरकही आहेत. दोन्ही धर्मांचे धर्मग्रंथ स्वतंत्र असून इतिहासपण स्वतंत्र व निराळा आहे.
दोघांमध्ये महत्वाचा फरक सैद्धांतिक आहे. जैन धर्मात पुद्गल कार्माण वर्गणांमुळे जो जीव बद्ध असतो तो जेव्हा “जीवाजीवास्त्रवबंधसंवरनिर्जरामोक्षासतत्त्वम” या आचार्य उमास्वामींच्या तत्त्वानुसार मुक्त होऊन सिद्धशिलेवर विराजमान होतो. अनंत काल पर्यंत अनंत दर्शन-ज्ञान-वीर्य-शक्ती-सुख या आत्मिक गुणांत रत होतो. पण बौद्ध धर्माप्रमाणे जीव हा असा नित्य शाश्वत पदार्थ नसून इतर पुद्गल पदार्थाप्रमाणे नाशवंत आहे. जैन धर्म पुनर्जन्म मानतो. बौद्ध धर्म पुनर्जन्म मानत नाही. जैनांचे लक्ष्य आत्मधर्म तर बौद्धांचे लक्ष्य लोकधर्म असल्याने त्या धर्माचा भारतात व भारताबाहेरही प्रसार झाला.
भारताबाहेर उदय पावलेल्या पण अनेक शतके भारतात चालू असणाऱ्या इस्लाम धर्माचा काही बाबतीत निकट संबंध आलेला आहे.
अरबस्तानातील या धर्मावर जैनधर्माचा प्रभाव दाखवणारे उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध अरब कवी आणि दार्शनिक अबुल अला यांचे जीवन होय. या कवीने आपली जी नैतिक मूल्ये ठरवली त्यावर जैन धर्माचा प्रभाव होता. तो अंडी खात नसे. मधाचा त्याग त्याने केला होता. जनावरांचे चामडे वापरणे पाप मानीत असल्याने तो पायात लाकडी खडावा घालत असे. भिकाऱ्याला दान देण्यापेक्षा माणसाने माशीला जीवदान देणे तो श्रेष्ठतर मानत असे. त्याने दिगम्बरत्त्वाची तारीफ केलेली आढळून येते.
जैनधर्म हा आस्तिकच आहे हे सिद्ध करण्याची अनेक करणे आहेत. त्यामुळे त्याला नास्तिक धर्म म्हणणे चुकीचे आहे
यासाठी आस्तिक नास्तिकतेच्या कसोट्यांवर परीक्षा करावी लागते. त्यासाठी खालील चर्चा उपयुक्त ठरेल.
जैनधर्म स्वतंत्र आणि प्राचीन धर्म आहे. सृष्टी अनादिअनंत आहे. ती कोणत्याही ईश्वराने निर्माण केलेली नाही. ईश्वर म्हणजे कोणी एकच व्यक्ती कोणतीही शक्ती नसून पुरुषार्थ केल्याने प्रत्येक जीव ईश्वर होऊ शकतो. म्हणून जैनधर्म सृष्टीचे कर्तृत्व कुठल्याही ईश्वराकडे देत नाही. जीव स्वतः स्वतःचा विधाता आहे.
कर्म कषायांमुळे मालिन झालेला आत्मा संसारात जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकून दुःखे भोगत असतो.ज्या जीवाला हा जन्म -मरणाचा फेरा चुकवायचा आहे तो कर्मबंधाचे पाश तोडून शाश्वत अश्या मोक्षलक्ष्मीस प्राप्त करून मुक्त होऊ शकतो. स्वतःच ईश्वर होऊ शकतो.
अश्या ईश्वराचे म्हणजेच जिनांच्या प्रतिमांची हृदयात व प्रतिकात्मकपणे मंदिरात स्थापना व पूजा अर्चा करून त्याच्या गुणांचे चिंतन मनन जैन धर्मीय करतो . म्हणून तो आस्तिक होय.
जीवाचे अंतिम ध्येय ..
जीवाचे अंतिम ध्येय मुक्ती मानल्यास त्याचा मार्ग कोणता? कर्मसंन्यास कि कर्मयोग ? हा प्रश्न प्राचीन काळी अध्यात्मवादी भारताप्रमाणे भौतिकवादी युरोपातही उपस्थित झाला होता. जर्मन तत्त्ववेत्ता शॉपेन हॉवर हा जैनधर्माप्रमाणेच कर्मसंन्यास व जिनोपदेश मानणारा होता.
गीतेतील जैनधर्म ..
कुरुक्षेत्रावर भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला जी गीता सांगितली त्यातही परधर्माचा परपदार्थाचा त्याग करून आत्म्याला शरण ये असे सांगितले आहे. आत्म्यात स्थिर हो कारण परधर्म भयावह आहेत. युद्धात तू गुंतलेला आहेस तर शत्रूबरोबर तर तू लढच पण त्याबरोबरच मुक्त आत्म्याचे स्मरण कर. तुझ्या आत्म्याला विकृत विचारांशी लढायचे आहे हे विसरू नकोस. तुला स्वधर्म पाळायचा असून आत्म्याचे रक्षण करून आत्म्याचे हित करावयाचे आहे. असा उपदेश गीतेतून दिलेला आहे.
जैनधर्मातील संप्रदाय ..
संप्रदाय म्हणजे एकाच धर्मामध्ये असलेल्या मतभेदावरून व पक्षोपपक्षांवरून तयार झालेले वेगवेगळे गट होय. त्यांनाच पंथ असेही म्हणतात.
यानुसार जैनधर्मात दिगंबर व श्वेतांबर हे दोन प्रमुख संप्रदाय तयार झाले.
या संप्रदायातून पुनः वेगळ्या कारणांनी निर्माण झालेलं पंथ म्हणजे तेरापंथ, वीसपंथ व तारण पंथ होय. पण हे तीनही पंथ दिगंबराचार्यप्रणित नाहीत.
दिगंबर व श्वेतांबर हे पंथ जैनधर्मातील साधूंच्या वस्त्र परिधानावरून पडलेले आहेत. दिक +अंबर म्हणजेच दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे ते नग्न दिगंबर साधु आणि श्वेत +अंबर म्हणजे पांढरी वस्त्रे धारण करणारे ते श्वेतांबर साधु .
या दोन्ही संप्रदायातील सैद्धांतिक फरक बरेच आहेत. पण स्थूल फरक असा आहेकी श्वेताम्बर पंथीय १९ वे तीर्थंकर भगवान मल्लिनाथ याना स्त्री मानतात मूर्ती मात्र पुरुषकारच करतात
दिगंबर पंथीय असे मानतात की सर्व तीर्थंकर क्षत्रिय वंशातले असून पुरुष लिंग व् नग्न अवस्थेत मुक्ति पावतात.
श्वेताम्बर पन्थियांची अशी मान्यता आहे की गृहस्थवेशात वस्त्रसहित मुक्ति होते. श्वेतांबरांचे हे सिद्धांत दिगंबरांना मान्य नाहीत. शिवाय त्यांच्या मते स्त्रियांनाही मुक्ति होते. दिगंबर पंथीय भगवान महावीरांना ब्रम्हचारी मानतात तर श्वेताम्बर पंथीय त्याना विवाहित दाखवतात.
गृहस्थी जीवनापासून पुढे संन्यास मार्ग प्रारंभ होऊन तोच पुढे जिन बनण्याचा मार्ग असतो.
“सम्यग्दर्शन ज्ञान चारित्र्याणि मोक्षमार्ग ” असे मुक्तिमार्गाचे सूत्र जैन धर्माने सांगितले असून त्यास धर्म रत्नत्रय धर्म , उत्तम धर्म, आत्मधर्म असे म्हटले आहे.
गृहस्थी जीवनात याचा क्रमशः प्रारंभ होतो. यासाठी अकरा पायऱ्या किंवा प्रतिमा असतात. गृहस्थी जीवनाच्या या चढत्या पायऱ्यांना म्हणजे चढत्या विशुद्धीला च पुढे ” गुणस्थान ” हे नाव दिलेले आहे.
जैन सिद्धांतांमध्ये प्राणिमात्रांची मोह व योग यामुळे जी परिणती होते तिला गुणस्थान अशी संज्ञा आहे. हे आत्म्यातिल गुण असतात. मोहनीय कर्मांचा जेव्हा या गुणांवर पडदा पडलेला असतो तेव्हा या गुणांत विकृती निर्माण होते आणि जीव खऱ्या आत्मस्वरूपापासून पराङ्मुख होतो. त्यास सन्मार्गाने चालणे कठीण होते. जेव्हा जेव्हा मोहाचा आत्मगुणांवरील पडदा बाजूस सारला जातो तेव्हा तेव्हा आत्मगुण विकसित होऊन प्रकट होऊ लागतात.
गुणस्थान म्हणजे अध्यात्मिक परिणामांच्या चढ उताराचा थर्मामीटर होय. मोक्ष प्राप्तीसाठी जिवाने नेहमी आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचे त्याच्या स्वभावाचे चिंतन करावे.
अध्यात्मात आत्मा म्हणजे रूप रस गंध याने रहित डोळ्यांस न दिसणारा आहे. आत्मा उत्तम अश्या क्षमा, मार्दव, आर्जव,शौच, सत्य,संयम, तप,त्याग, अकिंचन्य व ब्रह्मचर्य दशधर्मांनी युक्त आहे. आत्मा चैन्यस्वरूप ज्ञानमय असून ज्ञाता द्रष्टा आहे.
जैन धर्माने इंद्रियातीत व कोणाच्या कसल्याही मदतीशिवाय होणाऱ्या ज्ञानास ‘केवलज्ञान’ म्हटले आहे. या ज्ञानापासून मिळणारे सुख हे सर्वोच्च अध्यात्मिक सुख असे मानले आहे. म्हणून नेहमी आत्म्यास जागृत अवस्थेत ठेऊन मोक्षमार्गावर पुढे जात राहिले पाहिजे.
असे असले तरी जीव अनेक जन्मातील कर्मांमुळे कर्माने बद्ध झाल्यामुळे संसार सागरात हेलकावे खात जन्म मरणाच्या झुल्यावर मागे पुढे झोके घेत असतो.
या झोक्याला आधार देणारा पर्व, आत्म्याचा उत्सव म्हणजे पर्युषण पर्व होय.
पर्युषण पर्व भाद्रपद महिण्यात येतो. दिगंबर संप्रदायानुसार भाद्रपद शुद्ध पंचमीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस दशधर्मांचे चिंतन, स्वाध्याय उपवास अनशन किंवा एकासन आपल्या शक्तीनुसार जैन श्रावक करून आत्मशुद्धी करतात. शेवटच्या दिवशी एकमेकांशी प्रेमाने संभाषण करून वर्षभरात कळत नकळत झालेल्या अपराधाबद्दल एकमेकांची क्षमा मागतात आणि मोकळेपणाने क्षमा करतात.
या पर्वानिमित्य सम्राट अकबर याने आपल्या साम्राज्यात हिंसाबंदीचे फर्मान जरी केले होते
समाप्त.
श्री दश धर्मेभ्यो नमः
जैनांचा दशलक्षण धर्म
(दसरा-दिवाळी सणांच्या माहितीसह)
लेखक स.से. नानचंद हिराचंद शाह वागदरीकर
सहसंपादक जैनबोधकव समाचार सोलापूर .
श्री वीर संवत २४८७
सन १९६१
(दसरा-दिवाळी सणांच्या माहितीसह)
प्रति १००० मूल्य स्वाध्याय
या पुस्तकावरून साभार .