तुझ्या माझ्या गोष्टीमध्ये एक कौलारू घर होते
प्राजक्ताच्या झाडाखाली मोती-पोवळ्यांचे सर होते
तुझ्या माझ्या गोष्टीमध्ये व्हिलन बिलन कधीच नव्हता
धो धो कोसळणारा फक्त वेडा पाऊस होता
तुझ्या माझ्या गाण्यामध्ये दुःख उसासे कधीच नव्हते
दवात भिजल्या भाव फुलांचे एक सुंदर गाव होते
तुझ्या माझ्या प्रीतीमध्ये अन्तर शून्य शून्य होते
अंतरीच्या पाण्यामध्ये तुझे प्रतिबिंब होते
तुझ्या माझ्या डोळ्यांमध्ये सांग बरे काय होते
भिजणारे भिजवणारे खळखळणारे झरे होते
तुझे माझे माझे तुझे असे खरेच काय होते
उत्सुकतेने सळसळणारे एक अडनिडे वय होते