मी गोठले तरीही फुटले कधीच नाही
अन तापले तरीही विरले कधीच नाही
टाळून अडथळ्यांना वेगात धावताना
ध्येयास गाठले पण पडले कधीच नाही
बागेतल्या फुलांचा भरला सुगंध हृदयी
सौंदर्य प्राशिताना ढळले कधीच नाही
भव-सागरात वेडी उडवून लाट जाता
काठावरीच आले बुडले कधीच नाही
मिटवून इंद्रियांना मी ताणता मनाला
आले नभात फिरुनी तुटले कधीच नाही
मोडून लाज सारी बाया कुरूप होता
निर्लज्ज जाहले रे चळले कधीच नाही
ही वेगळी ‘सुनेत्रा’ का बावळी दिसे तुज
थकले जरी श्रमाने फिरले कधीच नाही