दवबिंदुंची निर्मळ भाषा कुठे कुणाला कळते आता
बोलीमधली अस्सल गाथा कुठे कुणाला कळते आता
केंद्रच नाही ठाउक ज्याला तोच ठरवितो दिशा अताशा
उजवासुद्धा असतो डावा कुठे कुणाला कळते आता
अंतरातल्या मायेला जो कपट ठरवितो तो शब्दच्छल
कोण काळ अन कोण विधाता कुठे कुणाला कळते आता
घाई घाई करून खाई क्षुधा तयाची भडकत जाई
कशामुळे ही होते खा खा कुठे कुणाला कळते आता
गारेवरती गार घासता ठिणगी पडते जुळती तारा
अन प्रीतीचा फुलतो चाफा कुठे कुणाला कळते आता
सरळसोट जो मार्ग तयावर विश्रांतीस्तव असे बाकडे
वळणावरती नसतो थांबा कुठे कुणाला कळते आता
सांग ‘सुनेत्रा’ तू लोभाला ”हव्यासाच्या फळात पाणी”
वाहून जाते जे जे जादा कुठे कुणाला कळते आता
मात्रावृत्त – (८+८+८+८ =३२)