पथ हा निर्जन स्वच्छ मोकळा
पिवळ्या पुष्पांनी सजलेला
पुढे दुतर्फा वृक्ष देखणे
पर्ण रहित घन गर्द फुलोरा
दूर दूर पथ कोठे जाई
भेटायाला कुठल्या गावा
स्वच्छ बाकडी सुनी सुनी ही
कुणी न त्यावर बसावयाला
धरणीवरती श्याम सावळ्या
आकाशाची निळसर छाया
पीत फुलांचा सडा भूवरी
झुळूक स्पर्शते हरित तृणाला
कोणासाठी कुणी बनविला
सुंदर झुळझुळता हा रस्ता