सुचत जाते काव्य मजला लिहित जाता प्रेमभावे
नित्य नेमी घाट अवघड चढत जाते प्रेमभावे
हृदय बोले अंतरीचे बोल काही साठलेले
दूरवर रानात वेणू वाजवी कुणी प्रेमभावे
भोवताली कोण आहे भान का ठेवू अता मी
फिरत राही चक्र नेमे फिरविता मी प्रेमभावे
वृक्ष वेली डोलताती पाखरे गातात जेव्हा
अक्षरेही सजीव होउन नाचताती प्रेमभावे
प्रेमभावाविन न मुक्ती जाण भक्ता भक्तिने
आत्मरंगी बुडून जावे तरुन जावे प्रेमभावा