प्राणपाखरे धडपड करती झुले शोधण्या फांदीवरती
जाळे घेउन फिरे पारधी खिळे ठोकण्या फांदीवरती
झाडांवरती पर्णपिसारा फळे पहुडली पानोपानी
नजर तीक्ष्ण मम मनहरिणाची फुले शोधण्या फांदीवरती
लाखो दवबिंदू ओघळती मोत्यांसम तरुतळी साठती
तृण वनदेवी कुदळ आणती तळे खोदण्या फांदीवरती
रंगत जाता सुरेल मैफल पहाट तारा नभी उगवला
विसरुन गेल्या शासनदेवी विळे, ओढण्या फांदीवरती
गझल गुणाची कणखर माझी टिकेल येथे माझ्यासंगे
वटवृक्षाच्या पारंब्यांची मुळे तोडण्या फांदीवरती
मात्रावृत्त – १६+१६=३२ मात्रा