बाळ आमचं शोनुलं
कुरळ्या केसाचं तान्हुलं
बाळाचे डोळे हसणारे
कान अंगाई ऐकणारे
बाळाचं नाक चाफेकळी
हनुवटीवर खोल खळी
गुलाबाची पाकळी
बाळाचा रंगीत पाळणा
जणु आजीचा झोळणा
झबलं बाळाचं झालरीचं
कुंचीवर चित्र मोराचं
बाळाचं बोरन्हाण आहे आज
पाहुण्या जमल्यात खास खास
बाळाला म्हणतात हास हास
दरवाजाला लावल्यात झावळ्या
बोरांनी भरल्यात रोवळ्या
आत्या आज्जी मावशी मामी
यांनी आणलीत खेळणी नामी
बाहुला बाहुली बदकं तीन
फुगे दोन इन मीन
बाळाने मारली त्यांना पिन
फुगे फुटले फट्ट
बोरं झाली लठ्ठ
पोरांनी केली गट्ट
डोकी झाली मठ्ठ