This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA, GAA LA GAA.
बावरी बाईक उडता वात भरल्यासारखी
सारखी धडके प्रिया तुज ब्रेक तुटल्यासारखी
सागरी सूर्यास्त बघता पश्चिमेला केशरी
भावना फेसाळते रे लाट फुटल्यासारखी
मोकळा रस्ता तुझ्यास्तव थांबला आहे जरी
तू अशी फिरतेस रमणी वाट चुकल्यासारखी
ओळखीचे गाव आहे पाळखीची माणसे
वावरे गावात पण ती नाव नसल्यासारखी
कृष्णवसना पौर्णिमेची शुभ्रता मृदु प्राशिता
चांदण्यांची बाग हसते चिंब भिजल्यासारखी
चारुशीला पद्मकांती कालिका सिद्धायिनी
का सदा कमळात बसुनी पाय नसल्यासारखी
उगवता नक्षत्रलोकी धूमकेतू तो ऋषी
वाटते आकाशगंगा पूर्ण भरल्यासारखी
ही जिजाऊ राजहंसी माय माझी मर्दिनी
जिंकुनीही वागते का आज हरल्यासारखी
मी ‘सुनेत्रा’ कोकिळा गे कुहुकता रानीवनी
गझल गाते सारिका ती कंठ चिरल्यासारखी
वृत्त- गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.