होऊ नको कधी तू आता उदास मित्रा
माझी दुकानदारी आहे झकास मित्रा
मी ना हरायची रे ना अंत मम गझलचा
मिथ्यात्व अंतरीचे करते खलास आता
मी रोख ठोक देते नाही उधार काही
फुलण्यास वाव देते दबल्या मनास मित्रा
साचून राहिलेले ओकून टाक झटकन
उपसून टाक आतिल पुरती भडास मित्रा
लाचार होत नाही पण जाणते स्वधर्मा
म्हणुनीच व्हेल मासा माझ्या गळास मित्रा
रानात माजलेले तण हे सुकून गेले
का रान वाटते तुज इतुके भकास मित्रा
हे रान ना भकासी भकभक जरी करे ते
रानास दाटलेला येतो सुवास मित्रा
माझे सुनेत्र दोन्ही येता भरुन पुन्हा
घनगर्द चिंबलेले जणु दिलखुलास मित्रा
नुरले किती कळावे भव कोणते किती ते
स्पर्शून कैक वेळा येते तळास मित्रा
लिहिते जरी कुणी हे लिहवून कोण घेते
आईपुढे कुणाची कसली मिजास मित्रा
लिहिते गझल सुनेत्रा ना काढण्या भकासी
माझी सुशांत प्रतिभा आली भरास मित्रा