येणार हाय एणाराय
पाऊस येणार हाय
रेन एणाराय
झिमझिम सरींनी
अंगण भिजणाराय
कधी काळी जमिनीत पेरलेलं
बी बियाणं बोलू लागणाराय
अंकुरातून अक्षर अक्षर
मान वर उंच करणाराय
अक्षर अक्षर चढत वर
शब्द सुंदर दिसू लागणाराय
नाजुक पोपटी पानांवर
शब्द शब्द बरसू लागणाराय
शब्दांचीच पानं होणाराय
पानांचेच शब्द होणाराय
पानं पानं जोडून जोडून
डहाळी डहाळी डूलणाराय
वाक्य वाक्य झुलणाराय
डहाळ्या डहाळ्या वाढत वाढत
फांदी हिरवीगार बनणाराय
वाक्यावाक्याला टाळ्या घेत
वीज लख्ख कडाडणाराय
ढग सैरावैरा धावणाराय
वादळ भर्रारा सुटणाराय
पाउस गारा कोसळणाराय
काव्याचा मळा फुलणाराय
कवी पळत येणाराय
पाऊस येणार हाय
रेन एणाराय