हे खरेकी, मी न याला, राग म्हणतो लाडके!
मूळ संख्येला दिलेला, भाग म्हणतो लाडके…
लाजणे जमतेच कोठे, सांग तुजला रागिणी;
रक्तिम्याला नेत्रिच्या अनुराग म्हणतो लाडके!
का सदा हृदयात कटुता, डूक धरण्या, नागिणी?
माझिया मी वासनेला नाग म्हणतो लाडके..
रंगवेड्या लालसेचे, लाड मी करुनी फुका;
चंदनी देहास तुझिया, साग म्हणतो लाडके!
तीट तुझिया, हनुवटीवर, कोण लावी मोहने?
काकदृष्टी मूढ त्याला, डाग म्हणतो लाडके..
आठवे मज का सदोदित, मौन तव ते बोलके?
प्रीतिच्या त्या मधुर वचना जाग म्हणतो लाडके!!
कज्जली डोळ्यात पाणी, मेघ भरती, दामिनी!
तव ‘सुनेत्रा’ नाव तैसे वाग म्हणतो लाडके!!!
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.