बकुळ फुलांच्या अगणित राशी तळी साठल्यावरी
परिमल जाई वाऱ्यावरुनी वनदेवीच्या घरी
वनदेवी मग निघे तरुतळी परिमल प्राशायास
सुगंधात त्या वनास अवघ्या भिजवाया भिजण्यास
अर्ध्या वाटेवरती भेटे तिज वेडा पाऊस
अडवुन तिजला म्हणे मैत्रिणी नको तिथे जाऊस
मृदगंधाला लुटून पुरते चल लोळू मातीत
खळखळणाऱ्या ओहोळांचे ऐकूया संगीत
धारेसंगे खेळत फुगडी दाव निराळा बाज
मजेमजेने चरण्यासाठी उन्हात लाह्या भाज
लाह्या वाटत दोघे जाऊ बकुळतळी त्या खास
वेचत पुष्पे परडीमध्ये करू पदांचा न्यास
फुलांस सुकल्या अंथरुया अन त्यावर झोपू शांत
स्वप्नामध्ये जाऊ गावा जिथे न कसली भ्रांत
स्वप्न उतरले सत्यामध्ये चल नाचू गाऊ
निसर्ग अपुला सखा मनोरम त्याला हे सांगू
मात्रावृत्त – १६+११ =२७ मात्रा