This Ghazal is written in Akasharganvrutta. Vrutta used here is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. Some critical problems in our society are discussed in this Ghazal.
जो तो इथे फुग्यांना फुगवून सोडणारा
फुटताच ते फुगोनी गालात हासणारा
येथे कुणी कळ्यांना उमलूच देत नाही
अन कागदी फुलांना सौद्यात लाटणारा
डोळे मिटून चोरी मार्जार पंथ यांचा
काव्यात चोरलेले भंगार मांडणारा
मुर्दाड कातडीचा ठरतो इथे विजेता
सजवून प्रेत अपुले आत्म्यास गाडणारा
टाळ्या नि बक्षिसांच्या लोंढ्यात ते बुडाले
ठरतो इथे भिकारी शब्दास जागणारा
समशेर नजर याची म्यानात परतवारे
आम्हास आवडे तो हुजराच वाकणारा
याला कशास संधी भेदिल अंबरा हा
पक्षी असाच निवडू किल्लीवर उडणारा
वाचाळ भाविकांच्या गर्दीत का ‘सुनेत्रा’
माणूस शोधते तू मौनास जाणणारा
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.