सर्पफणा सावली देतसे तपोलीन मुनीस
सिंह म्हणे मी शूर तुझ्यासम वीर क्षत्रियास
जलचर जीवा करुन मोकळे नित्यच शंखध्वनी
नीलकमल फुल नयन जलातिल नमिते मी त्यांस
कासव कणखर मुनी उभयचर सुंदर व्रतधारी
पुफ्फ मल्लिगा कुंभातिल जल देई पानांस
अर्हतधर्मी व्रती साधुचे अभयदान मीना
तृणमय कुंथळ सुरभित गिरिवर बकऱ्या चरण्यास
निर्झरकाठी हरिण दौडते शांती रानात
वज्रासम धनु सहज पेलते गोम्मट बाहूस
सायाळीचे अनंत काटे सिद्ध रक्षणास
विमल हृदय जल जुळल्या सुकरी ओंजळ भरण्यास
वंशवृद्धिस्तव पूज्य वासना शोभे महिषास
श्रेय कशाला हवीच मुक्ती सोज्वळ गेन्ड्यास
शीतल छाया वृक्ष देतसे शुद्धमति जीवास
दंतकथा जांभुळ मगरीची भावे पुष्पास
कैवल्याचे मृदुल चांदणे खिरे चंद्रबिंब
नाजुक स्वस्तिक कुसुम सुकोमल सुपारसनाथास
पद्म कमल दो संतचरण मृदु आज घरा येवो
सुमती धारण करून द्यावा निरोप चकव्यास
वानरकुलीन ब्रम्हवृंद जन अभिनंदन त्यांचे
घोडदौड मोक्षाची संभव तयांमुळे खास
हस्तासम नक्षत्र अजितगुण झुंबर आकाशास
अनेक वर्णी बैल खिलारी डोंगर माथ्यावरी
ऋषी सांगती कोसळ कोसळ नीर-प्रपातास