नकोच काही देणेघेणे
लिहावी छान मी गझल….
भेटावे वाटेल मनास तेव्हा
धाडावी छानशी गझल….
कशास मोजाव्या मात्रा नि बित्रा
अक्षरगण साचे वृत्तांची जत्रा …
फुलांच्या संगे खेळेन रंग
वाऱ्याची समाधी करेन भंग…
रंगास उधळत फुलांच्या वेड्या
काढूया वाऱ्या पक्ष्यांच्या खोड्या…
वाटेवर धोंडा मारता शिंग
त्याच्यावर धो धो ओतेन रंग …
वाटेच्या धोंड्यास सांगेन गोष्टी
गोष्टीत माझ्या कोळी नि कोष्टी …
झिंगाट पिंगेल हुंबाड वारा
चढेल उन्हाचा तापून पारा…
सांजेला मैफल ढगांची काळ्या
गडगड कडकड विजेच्या टाळ्या ….
करेल आभाळ गारांचा मारा
मातीच्या गंधात लोळेल वारा….
उन्हाच्या बनात नाच रे मोरा
फुलवत पिसारा दाखव तोरा…..
बसूदे टोळांना मोजत गारा
वाजवू धाडीचे आपण बारा…..