हृदयाचा हिय्या – HRUDAYAACHAA HIYYAA


हृदयाचा हिय्या एक विशुद्ध भावकाव्य …..
कवी ग्रेस यांच्या बहुतांश कविता विशुद्ध भावकविताच आहेत. याबाबत म्हणजे विशुद्ध भाव काव्याबाबत कवी ग्रेस स्वतःच असे म्हणतातकी, “विशुद्ध कवितेचा मार्गच तर्काला तिलांजली देऊन तर्काच्या पलीकडून खुणावणाऱ्या नक्षत्र वाटांचा मागोवा घेत असतो. विशुद्ध भावकवितेतील तार्किक सुसंगती लय तत्वाच्या आधारे साधली जात असते. ती जीवशास्त्राच्या सेंद्रिय घटकांप्रमाणे विकसित होत असते, फुलत असते.”
ग्रेससारखा कवी त्यांचा एखादा काव्यसंग्रह वाचून कळणं कठीण असलं तरीही त्यांच्या किंवा मुळात कोणत्याही काव्यावरच्या अतूट प्रेमापोटी जेव्हा निष्ठेने आपण त्या कवीचं काव्य वाचत जातो तेव्हा त्यातून काहीतरी अदभूत वेगळेपण आकळायला लागतं. ते काव्य वाचून त्याबाबतच्या आपल्या भावना, विचार जेव्हा आपण इतरांबरोबर शेअर करतो तेव्हा तेव्हा त्याबतचे इतरांचे विचार व आपले विचार एकमेकात मिसळून एक सशक्त विचारधारा निर्माण होते. ही विचारधारा रसिक हृदयापर्यंत सहजपणे झिरपते. त्या काव्याला मग रंग, रूप, नाद, पोत आणि गंधही प्राप्त होतो, असा माझा अनुभव आहे…
काव्यामध्ये जो निळा रंग असतो तो माझ्यामते साधारणपणे मनाचं गहिरेपण गडद करत जाणारा असतो. हे निळंशार गदडपण काव्याचं सौंदर्य वाढवतं. पण काही काही वाचकांमुळे किंवा त्यांच्या गढूळ दृष्टीमुळे हे गडद गहिरेपण कधी कधी त्यांच्याचपुरतं गढूळ होत जातं.
म्हणून मला असं वाटतं की काव्याचं किंवा साहित्यकृतीचं मूल्यमापन करताना समीक्षकाची किंवा आस्वादकाची वाचनदृष्टी विशुद्ध असायला हवी. तो त्या काव्याबाबत किंवा काव्याच्या क्रिएटर बाबत पूर्वग्रहदूषित नसावा. त्या काव्याच्या वाचनातून, त्यावरच्या उत्कट भावगर्भ चिंतनातून तो त्याबाबत उस्फुर्त विचार मांडणारा असावा.
समजा एखाद्या वाचकाला किंवा समीक्षकाला त्या कवीच्या किंवा कवयित्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडीफार माहिती असली तरीही त्याने कवितांवर भाष्य करताना विनाकारण त्यांचा संबंध कवीच्या किंवा कवयित्रीच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडू नये. जर असे घडले तर कधी कधी त्या कवीला किंवा कवयित्रीला, त्यांच्या  निकटवर्तीयांना याचा त्रास होऊ शकतो.
कवी ग्रेस यांची हृदयाचा हिय्या हि कविताही विशुद्ध भावकविताच आहे. आणि कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे कविता वाचत असतानाच तिच्यातील तार्किक सुसंगती लय तत्वानेच साधत साधत आपल्या डोळ्यासमोर ही कविता दृश्य रूपात साकार होते. त्या कवितेचे शीर्षक, कवितेतले शब्द, शब्दांचे भाव, त्यातला नाद, आणि त्यामुळे त्यात एकवटणारा अर्थ, आणि या अर्थप्राप्तीमुळे एक जिवंत काव्यदर्शन डोळ्यापुढे साकार होते… माझ्यापुढे ते असेच साकार झाले होते… पहिल्या ते शेवटच्या कडव्यापर्यंत आपण ते पाहुयात…
मंत्रात भारली झाडी
पक्ष्यांचे छंदही कलते
पाण्याला स्पर्श न करता
हे कोण चालले सरिते
एक नदी, स्वच्छ जलाने भरलेली नदी वहात वहात पुढे निघाली आहे. काठावर गर्द वनराई आहे. विविध फळाफुलांनी वनराईतील झाडे लगडलेली आहेत. फळे, फुले विविध वासाची, रंगरूपाची आहेत. झाडावर किलबिल,ट्विटट्विट,च्रीपच्रीप असा आवाज करत पाखरे उडत बागडत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या कलरवांमुळे एक मंत्रकल्लोळ तयार झालेला आहे. या मंत्रकल्लोळामुळेच ही झाडी मंत्राने भारल्यागत वाटत आहेत.
पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याचा आवाज, वाहत्या पाण्याचा आवाज, पानांच्या सळसळीचा आवाज अश्या वेगवेगळ्या नादातून, छंदातून, त्यांच्या एकत्र येण्यातून एक नवीनच वेगळा नाद, वेगळा छंद निर्माण झाला आहे. हा एकसंध नाद, एकसंध छंद अगदी सरळ भासत असला तरीही तो किंचित कललेला, झुकलेला, थोडा तिरकस वाटत आहे. त्या किंचित झुकण्यामुळेच त्याचं सौंदर्य, नादमाधुर्य आणखीनच वाढलंय..आणि अशावेळी या वाहत्या स्वच्छ जलाला स्पर्शही न करता हळुवार वलये, वळणे घेत आपल्याच नादात मग्न असे हे कोण बरे पुढे चालले आहे.
जळकंप सलिल रत्नांचे
वेशीहून आली धूळ
हृदयाचा हिय्या म्हणजे
हृदयाच्या आतील पीळ
सलिल म्हणजे पाणी, जल ! जलतरंग म्हणजे त्या पाण्यावर तरंगणारी जणू रत्नेच. या कडव्यात वेशीचा उल्लेख आहे. म्हणजे नदीकाठावर जणू एक गाव वसलेलं आहे. जिथून आपण त्या गावात प्रवेश करतो ती गावाची वेस असते. तर त्या वेशीवरून वाऱ्याबरोबर वाहत आलेली धूळ त्या सलील सलिलावर तरंगत आहे. सलिल सलील असल्याने ती धूळही सहज सहज आनंदात त्या पाण्यावरून वाहत चालली आहे. कवीच्या किंवा आस्वादकाच्या हृदयजळावर यावेळी उठणारे तरंग म्हणजे आपल्या स्मृतिसंचितातील धूळच… ही धूळ जशी आवडत्या स्मृतींची असू शकते तशी ती नावडत्या स्मृतींचीही असू शकते.
या धुळीमध्ये मग पंचेंद्रियांच्या वेशीवरून आलेली विकारांची, कषायांची धूळही मिसळते. हृदयजलावर तरंगू लागते. मग कधी कधी आपण खूप उदास होतो तर कधी कधी खूप आनंदित उत्तेजितही होतो. मग हृदय कधी जडशीळ भासतं तर कधी खूप हलकं फुलकं भासतं.. कधी त्यावर जणू मणामणांचं ओझं असल्यासारखं वाटू लागतं..पण कवी हृदयाचा माणूस या साऱ्या भावावस्था हृदयाचा हिय्या करून सहजपणे पेलतो. त्यातून पार होतो.
या कडव्यात कवी जणू सांगत आहेकी, हा हृदयाचा हिय्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अनेक जन्मांपासून हृदयाला म्हणजे आत्म्याला पडलेला पीळ आहे.
हा पीळ काहीजणांबाबत अगदी सहजपणे उलगडत सुटत जातो तर काहीजणांबाबत हा पीळ सुटता सुटत नाही. तो पीळ कोणी ओढून ताणून काढण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला त्याचा त्रासही होऊ शकतो…. कारण त्या विशिष्ट समयी त्या पिळाच्या बळावरच आपण जगतोय असं अज्ञानामुळे त्या व्यक्तीला वाटत असतं. विविध भावभावनांच्या लाटा व त्यात मिसळलेल्या आपल्या वासनांच्या किंवा इच्छांच्या लोटांमुळे मन जणू वादळलेल्या सागराप्रमाणे झालेलं असतं. या वादळाला तोंड देत एखादी व्यक्ती कधी कधी याच जन्मात बाहेर पडते तर कधी यासाठी अनेक जन्मही घ्यावे लागतात.
पुरुषाचे दुःख हलेना
पाळणा हालवी मुलगी
काठावर प्रियकर अंध
पापणीत मिटता सलगी
पुरुषाचा पिंड, त्याच्या दुःखाची जात स्त्रीच्या पिंडापेक्षा, दुःखापेक्षा जरा वेगळीच… पण यातही काही अपवाद असतातच. सर्वसामान्यपणे पाहता स्त्रीचं सुख असो वा दुःख ते उसळून उन्मळून उफाळून बाहेर पडतं. पण पुरुषाचं सुख दुःख आतल्या आत कोंडलेलं दबलेलं असू शकतं. आणि जर का याच्या अगदी उलट चित्र असेल तर ते स्त्री पुरुष काहीजणांच्या चर्चेचा विषय बनतात.
या कडव्यात एक मुलगी पाळणा हलवीत आहे आणि काठावर एक अंध प्रियकर उभा आहे असं वर्णन आलेलं आहे. आणि मग असा एक तर्क आणि फक्त या काव्यापुरताच असा एक तर्क असू शकतोकी कदाचित एखाद्या आंधळ्या(डोळे असूनही आंधळा) प्रियकराच्या सलगीतुन जन्माला आलेले ते मूल पाळण्यात आहे…मुलगी पाळणा हलवतेय आणि तो अंध प्रियकर ती सलगी स्वतःच्या बंद पापणीत मिटवून टाकत आहे….किंवा फक्त काव्यासाठीच दुसरा एक असाही तर्क असू शकतोकी,एक अशी मुलगी आहेकी जिने प्रियकर खरोखरच आंधळा असूनही त्याच्यावर प्रेम केलंय व या जवळिकीतून जन्माला आलेलं मूल पाळण्यात आहे व ती मुलगी पाळणा हलवतेय… आता यात मूल, मुलगी,अंध प्रियकर व एका पुरुषाचा उल्लेख आहे. या पुरुषाचे दुःख फुलत नाहीय. तर हा पुरुष कोण असू शकतो… तो मुलीचा बाप किंवा भाऊही असू शकतो. त्या पुरुषाचे दुःख निश्चल झाल्याने फुलून येत नाहीय. किंवा तो पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द तो अंध प्रियकरही असू शकतो.. हा काव्यापुरता केलेला फक्त एक तर्कच आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
बांधाच नदीचा ऐसा
मग घाटही चंदनगवळी
सोन्याचा ग ळ तोडाया
उसळून बुडे मासोळी
या कडव्यात परत नदी आलेली आहे. एखाद्या स्त्रीच्या बांधेसूद देहाचं जसं वर्णन करतात तसं वर्णन नदीचं आलेलं आहे.
मोहक वळणे घेत जाणाऱ्या नदीचा बांधाही अगदी वळणदार आणि वलयांकित. तिच्या देहाचे प्रत्येक वळण अगदी जिवंत सळसळणारे… एखाद्या मनस्वी कवीच्या काव्याप्रमाणे ताल सूर लयीत पुढे पुढे सरकणारे..मग अश्या या नदीचा घाटही चंदनगवळीच असणार… या चंदनगवळी घाटावर चंदनगवळीच उभा असणार.. चंदनाप्रमाणे सुगंधी वातावरणात पण भोवताली सर्पांचे वेढे असूनही हा चंदनगवळी तेथे तटस्थपणे उभा आहे. डौलदारपणे वाहणाऱ्या नदीचे संथ शान्त सौंदर्य निरखित तो उभा आहे… आणि या नदीच्या नीरात मासोळ्या, मासे झुळकन सुळकन, इकडून तिकडे, खालून वर, वरून खाली सळसळत लहरत आहेत.
इथे मासोळी हे प्रतीक जीवाची तृष्णा, तहान व्यक्त करणारे आहे. या मासोळीरूप जीवाला पकडायला इथे अगदी सोन्याचा गळ लावलाय. हा गळ म्हणजे जीवाला संसारात पकडून ठेवणारे साधन. म्हणजेच विविध मानवी इच्छा आकांक्षा,,माया ममता मोह वगैरे वगैरे ! तर असा हा सोन्याचा गळ तोडण्यासाठी ही मासोळी परत परत जळात बुडी घेते.. वर उसळी घेते.. कारण तिला या जळातून बाहेर पडून काठ गाठायचा आहे. पण मासोळीचे किनाऱ्याला येणे म्हणजे मासोळीचा मृत्यूचं… कारण मासोळी किंवा मासा जळाविना कसा जगू शकेल.. म्हणतातच ना जशी नृत्याविना बिजली नाही तशी जळाविना मासोळी कशी असेल….कशी जगेल बरे…
उकलते नदीचे वृत्त
तर दोन गणांची मात्रा
सरणातही दंग चिताका
गात्रातून तुटता यात्रा
आता समजा ही नदी म्हणजे वाहतं काव्य असेल, कुठल्याही प्रकारचं काव्य असेल, पोवाडा लावणी गझल सॉनेट किंवा अगदी मुक्तछंदही असेल तरी त्याचं एक नैसर्गिक उपजत वृत्त असतंच असतं.. तर ते वृत्त कोणतं हे जर उकलायचं असेल तर तिच्या काठावर शांतपणे जाऊन बसावं.
काठावर एखादे शव चितेत जळत असताना बघून साहजिकच कोणी योगी असा विचार करेलकी देह आणि आत्मा अश्या दोन गणांची बनलेली ही मानवी जीवनयात्रा… जेव्हा गात्रातून तुटत असते तेव्हा त्या देहाला जाळणारी चिता मात्र सरणावर सरणातच दंग असते..दंग असते जळण्यात आणि स्वतःच्याही नकळत इतरांनाही जाळण्यात…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.